यावलला सहा वर्षीय बालकाचे अपहरण : काकाच निघाला ‘मास्टरमाईंड’
Six-year-old boy kidnapped in Yawal: The uncle turned out to be the ‘mastermind’. यावल (11 जानेवारी 2026) : यावल शहरातील महाजन गल्लीत आत्याच्या घरी आलेल्या एका सहा वर्षीय बालकाचे अज्ञात दुचाकीस्वाराने अपहरण केले होते. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेर्यात अपहरणकर्त्याच्या संपूर्ण हालचाली कैद झाल्या. पोलिसांनी जलदगतीने आपला तपास करीत रात्रीच या बालकाला म्हसावद येथून सुखरूप परत आणले होते. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड हा या बालकाचा काकाच असल्याचे समोर आले आहे. एका गुन्हेगाराच्या मदतीने या बालकाचे अपहरण करण्यात आले व त्याच्या वडिलांकडून पैशांची मागणी करून आपसात पैसे वाटून घेण्याचा संबंधिताचा प्लॅन होता.
काय घडले यावल शहरात ?
यावल शहरातील महाजन गल्लीतील रहिवासी प्रमोद पांडुरंग तळेले यांच्या घरी डिंडोली, सुरत येथील रहिवाशी नरेंद्र विलास बेंडाळे मूळ रहिवाशी आडगाव, ता.यावल हे त्यांचा सहा वर्षीय मुलगा आदित्य नरेंद्र बेंडाळे यास सोबत घेऊन आले होते. आत्याच्या घरी हा मुलगा होता आणि त्याचे वडील व प्रमोद तळेले हे यावलच्या जुन्या तहसील कार्यालयाकडे आले. घराबाहेर असलेल्या या मुलाला एका दुचाकी चालकाने मी तुला तुझ्या पप्पांकडे घेऊन जातो माझ्यासोबत चल, असे सांगून दुचाकी वर बसवले मात्र पुढे जाऊन त्यांचे पेट्रोल संपले.

अपहरणकर्त्याची नकळत मदत
शहरातील एकाने त्याची दुचाकी देऊन त्याला पेट्रोल आणायला मदत केली. मात्र तरी देखील दुचाकी सुरू न झाल्याने तो दुचाकी ढकलून भुसावळ रस्त्यावरील अर्णव पेट्रोल पंपावर गेला. तेथे पेट्रोल भरल्यानंतर देखील त्याची दुचाकी सुरू होत नव्हती. हा संपूर्ण प्रकार बालक गंमतीने पाहत होता तर पेट्रोल पंपाच्या एका कर्मचार्यांनी दुचाकी सुरू करण्याकरिता देखील या अपहरणकर्त्याची नकळत मदत केली. आणि मग तो बालकाला घेऊन भुसावळच्या दिशेने पळाला. अपहरण झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्याच ठिकाणी अपहरण झालेल्या मुलाचा चुलत काका वैभव घनश्याम बेंडाळे (50, रा.सम्राट कॉलनी, जळगाव) हा देखील होता व काकाला समजले. की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणकर्त्याचा पूर्ण चेहरा दिसत आहे व आपले पितळ उघड पडेल म्हणून त्याने बाजूला होऊन मुलासं दुचाकीवर घेवून जात असलेल्या सचिन गुरुदास पाटील-माळी (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) याला कॉल करून सांगितले की तू सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. त्या मुलाला कुठेतरी सोडून पळून जा. दरम्यान सदर मुलास सोडतांना सचिन याने मुलाच्या वडिलांना कॉल करून सांगितले की, तेरा लडका तुझे सुरत पे मिल जायेगा, असे सांगून कॉल कट केला.
काकाच निघाला मास्टरमाईंड
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नरेंद्र बेंडाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी या गुन्ह्याचा स्वतः तपास केला. मुलाच्या वडिलांना आलेल्या कॉलवरून गुन्ह्याच्या मास्टरमाइंड असलेल्या मुलाच्या काकापर्यंत ते पोेहोचला. रात्री यावलमध्ये मुलाच्या वडीलांसोबतचं बहिणीच्या घरी झोपलेल्या वैभव बेंडाळे यास ताब्यात घेतले आणि पोलिसांनी खाक्या दाखवताच वैभवने गुन्ह्याची कबुली दिली. आपण सचिन गुरुदास पाटील-माळी यांच्या सोबत हा प्लॅन रचला होता. खंडणी मागितल्यानंतर दोघेजण आम्ही निम्मे निम्मे पैसे घेणार होतो. आर्थिक चणवण होती म्हणून पैशाच्या लालसेपोटी आपण हे कृत्य केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रात्रीच पोलिसांनी सहा वर्षीय आदित्य याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

