किन्ही एमआयडीसीतील शमजा प्लास्ट कंपनीतून 20 हजारांचे साहित्य लंपास


Material worth Rs. 20,000 stolen from Shamja Plast company in Kinhi MIDC भुसावळ (11 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक एफ-48 वरील शमजा प्लास्ट कंपनीतून चोरट्यांनी 20 हजारांचे साहित्य लंपास केले. 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 31 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा या कालावधीत ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अयान रेसिडन्सी, खडका रोड येथील रहिवासी व कंपनीच्या मालकीण शमाबेगम सैय्यद शमस (50) यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
कंपनीच्या कंपाउंड वॉलला तोडफोड करून आत प्रवेश करत चोरट्यांनी दोन क्रॉम्प्टन कंपनीच्या 20 एचपी क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारी तसेच वागले कंपनीचे दोन स्टार्टर असा एकूण सुमारे 20 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

कंपनीत कामासाठी आवश्यक असलेली ही यंत्रसामग्री चोरीस गेल्याने उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाग्यश्री चौधरी करीत आहे. औद्योगिक वसाहतीतील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना व उद्योजकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !