डोंबिवलीत भाजपा उमेदवाराकडून मतदाराला तीन हजारांचे पाकिट वाटपाचा शिंदे सेनेकडून भंडाफोड
In Dombivli, the Shinde faction of Shiv Sena exposed the distribution of Rs. 3,000 cash packets to voters by a BJP candidate डोंबिवली (11 जानेवारी 2026) : राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच डोंबिवलीत मात्र भाजपाच्या उमेदवाराकडून मतदारांच्या घरी प्रत्येकी तीन हजारांचे पाकिट दिले जात असल्याचा भंडाफोड शिंदे सेनेकडून करण्यात आल्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपने सर्वाधिक जागा 15 बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं उघडकीस आले असून डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी पैशांची पाकिटे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान पांढर्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केले जात असल्याचे निदर्शनास आले. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांची पाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात येत आहेत.
शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणार्याना रंगेहाथ हात पकडल्याने हे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर निवडणूक आयोगाचे पथक व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत मात्र भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या महापालिकेतही भाजप उमेदवाराकडून पैशांचं अशाप्रकारे होत असलेलं वाटप चर्चेत आहे.
दरम्यान, प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे त्यामुळे भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना उमेदवार येथे निवडणुकीच्या मैदानात आहे त्यामुळे येथे महायुतीतील दोन पक्षांतच थेट लढत होत असल्याने मोठी रस्सीखेंच पाहायला मिळते. विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत असल्याचंही दिसून येत आहे.

