अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने केले नगरसेवक : खासदार संजय राऊत म्हणाले ; लाजा कशा वाटत नाहीत


BJP made the accused in an atrocity case a corporator: MP Sanjay Raut said; Don’t they feel any shame अंबरनाथ (11 जानेवारी 2026) : अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक करण्याचा प्रताप भाजपाने केल्याने टीकेची झोड उठली असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाज वाटत नाही? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी एक निवडणूक दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम वाद लावलेला नाही, माझ्याकडून मी 11 लाख इनाम देईल, असे थेट आव्हान राऊतांनी दिले.

भाजपाच्या मते जनताच मूर्ख
खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपला असे वाटते की जनता मूर्ख आहे. त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल, असे त्यांना वाटते. माघार घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. एमआयएमसोबत जेव्हा युती केली आणि गोंधळ झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले.

अंबरनाथमध्येही काँग्रेससोबत युती केली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सांगावे लागले की ही युती नाही. तरीही निर्लज्जपणे अंबरनाथ-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी तुषार आपटे, ज्याच्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता, त्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचे काम करतात आणि त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता स्वीकृत सदस्य करतात अंबरनाथ नगरपालिकेत. एवढे धाडस यांच्यात येते कुठून? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे?
संजय राऊत म्हणाले, मी संशोधन करणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यात एवढे धाडस येते कुठून? महाराष्ट्रात ज्या विषयावर लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट उसळली होती, त्या प्रकरणातील आरोपी, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? ते असतील संघाचे कार्यकर्ते, केली असेल भाजपला मदत म्हणून त्याला ही बक्षिसी देता? उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला. तिथे निर्लज्जपणा दिसला तोच इथे दिसला. या महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भाजपचे किंवा फडणवीसांचे ते मोकाट सुटले आहेत. आम्ही काही केले तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यातून या गोष्टी घडत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !