भुसावळातील माजी नगरसेवक बारसे व सुनील राखुंडे हत्याकांडातील पसार आरोपीला अटक
The absconding accused in the murder case of former corporator Barse and Sunil Rakhunde in Bhusawal has been arrested भुसावळ (11 जानेवारी 2026) : भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व हॉटेल व्यावसायीक सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून दोन वर्षांपूर्वी बुधवार, 29 मे 2024 हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील काही आरोपींना अटक करण्यात आली असलीतरी काही संशयीत अद्यापही पसार आहेत. या हत्याकांडातील संशयीत विकास उर्फ सोनू प्रमोद पथरोड हा शनिवारी शहरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने संशयीताच्या मुसक्या आवळत त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर रविवारी वैद्यकीय तपासणीनंतर त्यास अटक करण्यात आली.
हत्याकांडानंतर संशयीत पसार
बुधवार, 29 मे 2024 मे रोजी रात्री कारने निघालेल्या संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर संशयीतांनी गोळ्या झाडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडात संशयीत विकास उर्फ सोनू प्रमोद पथरोड (भुसावळ) याचेही नाव असल्याने मात्र तो पसार असल्याने त्याचा शोध सुरू होता. शनिवारी संशयीत आल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला निर्देश दिल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले व गुन्हा भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने संशयीताला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, अक्षय कोतकर व प्रियंका भोसले आदींच्या पथकाने केली.

