भुसावळात गुरुवारी उपनगराध्यक्षांची निवड : भाजपाकडून अनेक नावांवर खलबते
भाजपला उपनगराध्यक्ष पदासह तीन राष्ट्रवादीला एक स्विकृत नगरसेवक
The election for the Deputy Mayor will be held in Bhusawal on Thursday: BJP is deliberating on several names भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शहरात आता उपनगराध्यक्षपदाचे वेध लागले आहे. बहुमतामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होईल, हे निश्चित आहे.उपनगराध्यक्ष निवड व स्विकृत नगरसेवकांच्या नावांच्या घोषणेसाठी गुरुवार, 15 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात ही निवड प्रक्रिया नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भाजपला तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) एक तर अपक्ष व दोन राजकिय पक्षांचा गट स्थापन झाल्यास या गटाला एक अशा स्विकृत नगरसेवकाच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने दोन स्विकृत नगरसेवक करण्यासाठी सदस्यांची जमवाजमव सुरू केली आहे. स्विकृत नगरसेवक पदासाठी 24 तास आधी गटनेत्यांना जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे.
नगरसेवकांना दिला अजेंडा
पालिकेच्या निवडणुकीनंतर 25 दिवसांच्या आत विशेष सभा घेवून उपनगराध्य निवड करण्याचा नियम आहे. या नियमांनुसार याबाबत जिल्हाधिकार्यांनी 15 जानेवारीला सर्वसाधारण सभेचे आदेश दिले आहेत. यानुसार पालिका प्रशासनाने शनिवारी नगरसेवकांना सर्वसाधारण सभेसाठी अजेंडा दिला आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे या या सभेच्या पिठासीन अधिकारी असतील.

नामनिर्देशीत सदस्य निवड होणार अशी
नामनिर्देशीत सदस्य पदाची निवड गुरुवार, 15 रोजी उपनगराध्यक्ष निवडीनंतर त्याच सभेत होईल. त्यापूर्वी गटनेता व पक्षांना जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव द्यावे लागतील. जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्ज्याच्या अधिकार्यांकडून प्राप्त नामनिर्देशन शिफारस पत्र व अहर्तचे पुरावे यांची छाननी करुन नावे वाचून दाखवली जातील. नावे जास्त असल्यास आवश्यकतेनुसार संबधीत पक्ष, गटाकडून लेखी स्वरुपात अंतीम नावे घेतली जातील. यानंतर नावे जाहिर केली जातील.
निवडीची प्रक्रिया अशी होणार
सभेच्या दिवशी अर्थात 15 जानेवारीला सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान मुख्याधिकार्यांकडे उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन सादर करता येईल. यानंतर 11 ते 11.30 दरम्यान नामनिर्देशनपत्रांची छाननी वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या व निवडणूक लढविणार्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रम घोषीत केले जातील. यानंतर 11.30 ते 11.45 दरम्यान माघारीची मुदत राहिल. यानंतर नावे वाचून दाखवणे व आवश्यकतेनुसार उपाध्यक्ष पदाची निवड होईल.
24 तास आधी द्यावे लागतील स्विकृतसाठी नामनिर्देशन अर्ज
महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती नामनिर्देशीत सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पध्दत नियम 2010 व त्यातील सुधारणा नियम 2012, 2019 मधील तरतुदी तसेच 21 डिसेंबर 2016 मधील मुद्दा क्रमांक 6 नुसार स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती होते. यासाठी गटनेत्यांना सर्वसाधारण सभेच्या किमान 24 तास आधी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव अर्थात नामनिर्देशन द्यावे लागतील. या प्रस्तावाची छाननी होऊन नावे नामनिर्देशीत सदस्य होतील. एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा 10 नगरसेवकांमागे एक यापैकी जी संख्या कमी असेल तितके स्विकृत नगरसेवक दिले जातात. दोन्ही नियमांनुसार भुसावळात पाच स्विकृत अर्थात नामनिर्देशीत सदस्य असतील. संख्याबळानुसार भाजपचे तीन, राष्ट्रवादीचा एक तसेच राष्ट्रवादी अजीत पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्षांची आघाडी नोंदणी झाली तर या गटाला एक सदस्यपद मिळू शकेल.
भाजपाकडून पाच वर्षात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी
पालिकेत उपनगराध्यक्ष पदावर बहुमतामुळे भाजपला संधी मिळेल. भाजपने यात बेरेजेचे राजकारण केले आहे. एका नगरसेवकाला केवळ वर्षभरासाठी उपनगराध्यक्ष पदासाठी तसेच स्विकृत नगरसेवकासाठीही एक वर्षासाठी संधी दिली जाणार आहे. यामुळे पाच वर्षांत पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्ष तर शहरातील विविध क्षेत्रातील 15 जणांना स्विकृत नगरसेवक पदावर संधी मिळणार आहे. पहिल्या वर्षी कुणाला संधी मिळणार? याबाबत नावाचा सस्पेन्स असलातरी सामाजिक समीकरणे पाहून या पदाची नगरसेवकाची निश्चिती होवू शकते, अशी आतल्या गोटातील चर्चा आहे.

