दोन लाखांची लाच भोवली : थाळनेर पोलिस ठाण्यातील हवालदार धुळे एसीबीच्या जाळ्यात
चौघांविरोधात गुन्हा : तीन संशयीत कॉन्स्टेबल पसार ; कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ
गणेश वाघ
Bribe of two lakhs proves costly: Constable from Thalner police station caught in Dhule ACB’s net. धुळे (12 जानेवारी 2026) : अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना थाळनेर पोलिस ठाण्यातील हवालदाराला धुळे एसीबीने सापळा रचून अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात चार संशयीत निष्पन्न झाले असून त्यातील हवालदाराला लाच घेताना पकडण्यात आले आहे मात्र तीन कॉन्स्टेबल कारवाईची कुणकुण लागताच पसार झाले आहेत. एकाचवेळी एसीबीच्या सापळ्यात चार कर्मचारी अडकल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवार, 12 रोजी सायंकाळी हा सापळा यशस्वी करण्यात आला.
चार संशयीतांविरोधात गुन्हा
लाच प्रकरणी कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) यास अटक करण्यात आली असून अन्य संशयीत
पोलिस हवालदार भूषण येशूपाल रामोळे, पोलिस कॉन्स्टेबल धनराज बबन मालचे, पोलिस कॉन्स्टेबल किरण सखाराम सोनवणे पसार झाले आहेत. या प्रकरणी वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वरपाडा, ता.शिरपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरोधात 18 ऑक्टोबर 2023 रोजी थाळनेर पोलिसात अंमल पदार्थविरोधी कलमान्वये गुन्हा (गुरनं.157/2023) दाखल आहे. थाळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार भूषण रामोळे, कॉन्स्टेबल धनराज मालचे, किरण सोनवणे, मुकेश पावरा आदींनी तक्रारदाराच्या वडिलांना अटक करायची नसल्यास तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले होते व तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने सोमवारी धुळे एसीबीकडे या संदर्भात दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदवण्यात आली.
करवंद नाक्यावर एसीबीची कारवाई
लाचेची पडताळणी केल्यानंतर धुळे एसीबीने साध्या वेशात सोमवारी दुपारी सापळा रचला. शिरपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) याने लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर पथक दबा धरून बसले व संशयीताने तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचा इशारा मिळताच संशयीताला अटक करण्यात आली तर अन्य संशयीत पथक आल्याचा सुगावा लागताच पसार झाले. दोन लाखांची लाच देताना काही चलनी नोटा तसेच काही खेळण्यातील नोटांचा वापर करणयत आला.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, कॉन्स्टेबल जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

