चाळीसगावात गरजवंतांना अन्नदानासह स्थलांतर करणार्‍यांना मदतीचा हात


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेंनी केले उपक्रमाचे कौतुक

चाळीसगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांना दोन वेळचे जेवण मिळणे दिव्य झाले आहे. शासनाने स्वस्त धान्य उपलब्ध करून दिले असले तरी शेकडो, हजारो विस्थापी, निराधार कुटुंब मात्र शासनाच्या या योजनेपासून हजारो कोस दूर आहे. अशा काही गरजवंतांना दोन वेळचा घास भरविण्याचे कार्य स्वयंसेवकांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या अंतर्गत सलग 47 दिवसांपासून केले जात आहे.

स्वयंसेवी तरुणांकडून गरजूंना जेवण
वाड्या, वस्ती, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे अनेक असे निराधार मंडळी प्रत्येक रात्र सहर्षमय पद्धतीने काढत असतात. त्यांचे लॉकडाउन काळात हाल होऊ नये म्हणून त्यांच्यापर्यंत या स्वयंसेवी तरुणांकडून जेवण दिले जात आहे. याशिवाय काही पाणी पुरी विक्रेते, मजूर यांनाही अन्नदान करून लाखमोलाचे कार्य या स्वयंसेवी तरुणांकडून सुरू आहे तर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना जेवण देण्यासोबत लॉकडाउन काळात स्थलांतर करीत असलेल्या नागरीकांना प्रवासादरम्यान खाण्याची व्यवस्था करुन दिली जात आहे.



‘एक हात मदतीचा’ मागे यांचे परीश्रम
कोरोनाने देशातील घडामोडी 22 मार्च रोजी स्तब्ध झाल्यानंतर 14 एप्रिल पर्यंतचा 21 दिवस व त्यानंतर वाढलेला 17 मे पर्यंतचा लॉकडाउन झाल्यानंतर निर्मनुष्य रस्ते, ओस पडलेल्या शाळा, शटर डाऊन असलेले हॉटेल्स असे सारे धीरगंभीर वातावरण व कोरोनाचे भूत मानगुटीवर बसले असतांना अशा काळात गोरगरीब व दुर्लक्षित घटकांना असलेल्या दोन वेळचे जेवण देण्याचे काम शहरातील स्वप्निल कोतकर, अभिजीत शितोळे, चंद्रकांत चौधरी, स्वप्निल धामणे, हर्षल ब्राह्मणकर, अभिलाष एसके, कैलास कासार, निरज कोतकर, सागर गवळी हे स्वयंसेवक सातत्याने ‘एक हात मदतीचा’ या अंतर्गत माणुसकीची भावना जोपासत असून त्यांच्या कार्याचे चाळीसगावकरांनी कौतुक केले आहे.

आजवर 45 हजारांवर नागरीकांना जेवण
शहरात ठिकठिकाणी वास्तव्यास असलेले भटके, हातावर पोट भरुन उदरनिर्वाह करणारे मजूर, पायपीट करीत आपल्या गावी निघालेली मंडळी, यासोबत शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारार्थ भरती असलेले रुग्णांसह नातलग तसेच गरजु व वंचित कुटुंबाला दोन वेळचे जेवण देण्यासाठी स्वयंसेवक सरसावले असून सकाळी 450 ते सायंकाळी 480 डबे देत आजवर सुमारे 45 ते 48 हजार डबे देण्याची सुविधा पुरविली गेली असल्याचे स्वयंसेवकांनी यावेळी सांगितले.

स्वयंसेवकांचे कार्य कौतुकास्पद -जयंत पाटील
लॉकडाउन काळात गरजवंतांची निकड लक्षात घेता स्वयंसेवकांनी केलेले अन्नसेवेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

स्वयंसेवक जणू देवदूतच : आशा इंधवे
लॉकडाउनच्या काळात आमच्यासारख्या हातावर पोट असलेल्या नागरीकांना दोन वेळचा घास देण्याचे काम समाजसेवक एक महिन्यापासून करीत असून रोजगारापासून वंचित असलेल्यांसाठी स्वयंसेवक जणू दुत ठरले आहेत अशी भावना आशा इंधवे यांनी व्यक्त केली.

47 दिवसांपासून अविरत सेवा : स्वप्नील कोतकर
आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना जोपासत आम्हा स्वयंसेवकांच्या वतीने गेल्या 47 दिवसापासून अविरत सेवेच्या माध्यमातून क्षुधाशांती भागविली जात असल्याचे स्वप्नील कोतकर यांनी यावेळी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !