मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका ; आरक्षण विरोधात जाणार्यांना मतदान करू नका !
Manoj Jarange’s clear stance : Do not vote for those who oppose reservations! बुलढाणा (12 जानेवारी 2026) : जे समाजाच्या विरोधात गेले होते, जे आरक्षणाच्या विरोधात गेले, नेमके तेच आता निवडणुकीत उभे असल्याने यांना मतदान करू नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी केले आहे.
मराठ्यांनी आता कडवट वागावे
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे. मुस्लिम दलितांची या सरकारने काडी लावून टाकली. या सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचे नाही. आम्ही कसे लोकसभेला एवढा फेस काढला होता. निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर यांनी पैसे वाटलेच आहेत. खूप माल आहे यांच्याकडे. यांच्याकडे आधी काय होते? आता खूप पैशांचे बंडल आहेत वाटते. शर्टामधून दिसतील असे बंडल हे सोबत ठेवतात. नोटा वाटतात आणि घोळ करतात. या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही.

यांचे शत्रू आपणच ना ?
मनोज जरांगे म्हणाले, यांचे राष्ट्रवादीसोबत जमते, भाजप शिवसेनेसोबत जमते, काँग्रेससोबतही युती आहे. हे सर्व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र आले आहेत. म्हणजे याचे शत्रू कोण तर आम्हीच ना, गोरगरीब जनता? आपल्या पक्षाचा नेता निवडून आला पाहिजे मग युती कुणासोबतही करा असा या लोकांचा अजेंडा आहे.

