कमकुवत, अस्थिर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अजून चार दिवस राहिल थंडीचा तडाखा


भुसावळ (12 जानेवारी 2026) : कमकुवत तसेच अस्थिर असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बनसांमुळे शीत लहरी टिकून आहेत. उत्तरेकडून सलग येणार्‍या शीत लहरीमुळे थंडीचे तीव्रता अजून काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. 11 ते 15 जानेवारी दरम्यान देखील भुसावळ विभागासह जिल्ह्यात थंडीचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमान 10 ते 12 अंशांच्या दरम्यान राहू शकेल. तर किमान तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस राहील. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात थोडीशी अस्थिरता देखील आहे, म्हणजे रोज एकसारखेच तापमान राहण्याची शक्यता कमी आहे. दररोजच्या कमाल व किमान तापमानात सरासरी एक ते दीड अंशांनी घसरण किंवा वाढ होण्याचाही अंदाज आहे. मात्र थंडीचा तडाखा अजून किमान आठवडा ते दहा दिवस कायम राहणार आहे.

ढगाळ वातावरण राहिल
13 जानेवारी दरम्यान भुसावळ विभागासह जिल्ह्यात काहीसे ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे उष्णतेत घट होऊन थंडीचा जोर वाढेल. विशेषतः सकाळी आणि रात्री याचा प्रभाव जास्त जाणवेल.सकाळच्या वेळी धुके राहण्याचे देखील शक्यता आहे. दुपारच्या वेळी मात्र हवामान काहीसे उबदार राहील. तर ढगाळ वातावरणामुळे विषमता निर्माण होणार आहे.

थंडीने वेळापत्रक बदलले
भुसावळातील बाजारपेठेवर थंडीचा परिणाम होत आहे. सकाळी 10 वाजेनंतरच दुकाने व प्रतिष्ठाने उघडली जात आहेत, तर रात्री 10 वाजता बंद होणारी बाजारपेठ 9 वाजताच ग्राहक नसल्याने बंद होत आहे. थंडीचा जोर वाढल्याने रात्री साडेआठ ते नऊ वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट होतो. बाजारात ग्राहक राहत नसल्याने दुकाने लवकर बंद करण्याकडे दुकानदारांचा कल वाढला आहे.

केळीवर करपा वाढला
थंडीचे प्रमाण वाढल्याने भुसावळ विभागातील यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये केळीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. अनेक भागात केळीच्या पानांवर पिवळे डाग पडले आहेत. करप्यामुळे फळधारणा होण्यासाठी तसेच अडथळे निर्माण होत आहेत. केळीच्या निसवणीवर परिणाम झाला आहे. यामुळे उत्पन्नात घसरण होऊन उत्पन्नावर परिणाम होण्याची भिती आहे.

तिसर्‍या आठवड्यातही थंडी
जानेवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात देखील थंडीचा जोर काहीसा राहण्याची शक्यता आहे. या काळात किमान तापमान 10 ते 13 अंशांच्या दरम्यान राहू शकेल. तर दिवसाचे कमाल तापमान 30 ते 32 अंशांच्या दरम्यान राहिल. दिवसाच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

थंडी जास्त दिवस टिकणार
उत्तर-मध्य भारतात थंडीची लाट आहे. उत्तर भारतात सतत दाट धुके आणि कमी ढगांमुळे सूर्यप्रकाश कमी होतो, ज्यामुळे दिवस-रात्र दोन्ही थंड राहत आहेत. उत्तरेकडील बर्फाळ वार्‍यांमुळे ही थंडी जास्त दिवस टिकण्याचा अंदाज वर्तवला आहे. एकूणच, ही सर्व कारणे पाहून पुढील आठवड्यात तापमानात फारसे काही मोठे बदल होण्याची शक्यता दिसून येत नाही, असे हवामान अभ्यासक नीलेश गोरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !