दोन लाखांचे लाच प्रकरण : थाळनेरच्या पोलिस कर्मचार्‍याला दोन दिवसांची पोलिस कोठडी

हवालदारासह तिघा पोलिस कर्मचार्‍यांचा एसीबीकडून कसून शोध सुरू


Two lakh rupee bribery case: The police officer from Thalneer has been remanded to police custody for two days धुळे (12 जानेवारी 2026) : अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना थाळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलला धुळे एसीबीने सापळा रचून अटक केली होती. या गुन्ह्यात चार संशयीतांचा सहभाग आढळला मात्र कर्मचार्‍याला पकडताच हवालदारासह तीन कॉन्स्टेबल एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच पसार झाले होते. दरम्यान, अटकेतील कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वरपाडा, ता.शिरपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांविरोधात 18 ऑक्टोबर 2023 रोजी थाळनेर पोलिसात अंमल पदार्थविरोधी कलमान्वये गुन्हा (गुरनं.157/2023) दाखल आहे. पोलिस हवालदार भूषण येशूपाल रामोळे, पोलिस कॉन्स्टेबल धनराज बबन मालचे, पोलिस कॉन्स्टेबल किरण सखाराम सोनवणे व कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा यांनी तक्रारदाराच्या वडिलांना अटक करायची नसल्यास तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले होते व तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने सोमवारी धुळे एसीबीकडे या संदर्भात दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर सापळा रचून पावरा यास पकडण्यात आले मात्र तीन संशयीत पसार झाले होते.

पोलिस कर्मचार्‍याला कोठडी
कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) यास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात निरीक्षक पद्मावती कलाल व सहकारी करीत आहेत.

कारवाई होताच अधिकार्‍यासह चौघा लाचखोरांचे निलंबन
लाच प्रकरणात कारवाई होताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी थाळनेर प्रभारी शत्रूघ्न पाटील यांचे स्लॅक सुपरव्हीजन व कर्मचार्‍यांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवत निलंबित केले शिवाय लाच प्रकरणातील पोलिस हवालदार भूषण येशूपाल रामोळे, पोलिस कॉन्स्टेबल धनराज बबन मालचे, पोलिस कॉन्स्टेबल किरण सखाराम सोनवणे, कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा यांचेही निलंबन केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !