15 लाखांसाठी नातवानेच केली वृद्ध दाम्पत्याची हत्या
आजीने हाताला घेतलेल्या चाव्याने हत्याकांडाची उकल : आरोपीला अटक
The grandson murdered the elderly couple for 15 lakhs नवी दिल्ली (14 जानेवारी 2026) : डोक्यावर झालेल्या 15 लाखांच्या कर्जापोटी उसनवार घेतलेले 15 लाख आजी-आजोबा मागत असल्याने संतप्त नातवानेच दोघांचा खून केला मात्र प्रकरण अंगाशी न येण्यासाठी घरात लूट झाल्याचा बनाव करण्यात आला मात्र नातवाच्या हाताला बांधलेला चिकटपट्टीने गुन्ह्याची उकल केली. वृद्धांची हत्या करताना आजीने नातवाच्या बोटाला चावा घेतला व पोलिसांसाठी ही जखम तपासात दुवा ठरली. आरोपी नातवाला पोलिसांनी अटक केली.
असे आहे प्रकरण
हरियाणातील करनाल जिल्ह्यातील असंध भागात राहणार्या वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा लाडका नातूच असल्याचे निष्पन्न झाले. रविंद्र नावाच्या या नराधम नातवाने आपल्या आजी-आजोबांची अतिशय क्रूरपणे हत्या केली मात्र मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आजीने घेतलेला एक चावा या संपूर्ण हत्याकांडाचा सर्वात मोठा पुरावा ठरला.

नेमकं प्रकरण काय?
हरि सिंह आणि त्यांची पत्नी लीला या वृद्ध दाम्पत्याची 11 जानेवारीच्या रात्री घरात घुसून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा प्रकार लुटमारीचा वाटत होता. स्वतः नातू रवींद्र प्रसारमाध्यमांसमोर येऊन घरात लूट झाली, असे रडण्याचे नाटक करत होता. पण त्याच्या हाताच्या बोटाला असलेल्या एका पट्टीने पोलिसांचे लक्ष वेधले. जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले, तेव्हा त्याने लाकूड कापताना जखम झाली असे थातूरमातूर उत्तर दिले. मात्र, घटनास्थळी असे कोणतेही खुणा न आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला.
मृत्यू आधी आजीने दिला ’तो’ पुरावा!
पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, तेव्हा रविंद्रने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, जेव्हा तो आजीच्या तोंडावर चिकटपट्टी लावत होता, तेव्हा जीव वाचवण्यासाठी धडपडणार्या आजीने त्याच्या बोटाचा जोरात चावा घेतला होता. आजीने दिलेली ही जखम रविंद्रसाठी फास ठरली. मरता मरता आजीने आपल्या मारेकर्याची ओळख आपल्या दातांच्या निशाणीने पोलिसांसमोर उघड केली.
का केली हत्या?
रविंद्रच्या वडिलांवर 15 लाख रुपयांचे कर्ज होते, जे आजोबा हरि सिंह यांनी फेडले होते. आता आजोबा ते पैसे परत मागत होते. पण रविंद्रला ते पैसे परत करायचे नव्हते. उलट, आजोबांची संपत्ती आणि घराचा ताबा मिळवण्यासाठी त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा कट रचला. रविंद्रने प्रदीप कुमार आणि गुलशन या दोन साथीदारांना सोबत घेऊन भिंत ओलांडून घरात प्रवेश केला आणि आपल्याच रक्ताच्या नात्याचा गळा आवळला.
भोंदूगिरीचा बुरखा फाटला
रविंद्र हा समाजात स्वतःची प्रतिमा एका साधूसारखी मिरवत असे. तो भगवे कपडे परिधान करायचा, पूजापाठ करायचा आणि लोकांना औषधे वाटून प्रभावित करायचा. त्याला आजोबांच्या घरात मंदिर बांधायचे होते. एकाच हत्येमधून कर्जमुक्ती, संपत्तीवर ताबा आणि मंदिर निर्माण असे तीन हेतू त्याला साध्य करायचे होते मात्र कायद्याच्या हाताने त्याच्या या विकृत स्वप्नाचा अंत केला आहे. पोलिसांनी सध्या या तिन्ही आरोपींना दोन दिवसांच्या रिमांडवर घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

