चाळीसगावजवळ भीषण अपघातात हिरापूरच्या भावंडांसह तिघे ठार

भरधाव आयशर दुचाकीवर आदळून अपघात


Three people, including siblings from Hirapur, were killed in a horrific accident near Chalisgaon चाळीसगाव (14 जानेवारी 2026) : भरधाव आयशर दुचाकीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात भावंडांसह तिघे ठार झाले. हा अपघात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळील नूरानी मशीद परिसरात सोमवारी रात्री घडला. अपघातातील मयत हिरापूर येथील रहिवासी आहेत. या अपघाताने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.

यांचा ओढवला मृत्यू
भीषण अपघातात सागर संजय वराडे (27), सोमनाथ संजय वराडे (32) व अक्षय बापू पाटील (30, तिघेही हिरापूर, ता.चाळीसगाव) यांचा मृत्यू ओढवला. सागर आणि सोमनाथ हे सख्खे भाऊ असल्याची माहिती असून अपघाताने वराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवार, 12 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हे तिघे तरुण दुचाकीवरून तळेगावहून हिरापूरकडे येत असताना नूरानी मशीदजवळ समोरून येणार्‍या आयशर कंपनीच्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. तिघेही तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ग्रामस्थांची धाव
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर आयशर चालक वाहन सोडून पसार झाला. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. एकाच गावातील तीन होतकरू तरुणांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने हिरापूर गावातील प्रत्येक घरात शोक व्यक्त केला जात आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !