भुसावळात तिसर्या गटाची नोंदणी : गटनेतेपदी बबलू बर्हाटे
राष्ट्रवादीच्या दोन स्विकृत सदस्यांच्या मनसुभ्यांवर पाणी : भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, अपक्षांचा व राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा एक नगरसेवक होणार
भुसावळ (14 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेची उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड गुरुवार, 15 रोजी प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. मंगळवार, 13 रोजी राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना व अपक्ष अशा सहा सदस्यांच्या नवीन गटाने जिल्हाधिकार्यांकडे नोंदणी केली आहे. या गटाच्या गटनेतेपदी शिवसेनेच्या बबलू बर्हाटे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 जागांवर विजय मिळवलेल्या भाजप, 12 जागांवरील विजयी राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने स्वतंत्रपणे गट नोंदणी केली.
तिसर्या गटातूनही होणार स्वीकृत नगरसेवक
आता पाचपैकी एक स्विकृत नगरसेवक या नवीन तिसर्या गटाचा होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका स्विकृत सदस्य पदावर समाधान मानावे लागणार आहे. राष्ट्रवादीने दोन स्विकृत नगरसेवक होण्यासाठी संख्याबळाची जुळवा-जुळव केली मात्र राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना व अपक्षांच्या या गट निर्मितीमुळे राष्ट्रवादीच्या मनसुभ्यांवर पाणी फिरले आहे.

काँग्रेसची गटनिर्मिती नाही
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसेचे तीन नगरसेवक विजयी झाले आहे मात्र या तिघांनीही परस्परांमध्ये सामंजस्य नसल्याने गट नोंदणी केली नाही. हे तिन्ही तसेच एक अपक्ष असे चार सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गळाला लागले असते तर संख्याबळ 18 वर पोचले असते. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन स्विकृत सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला असता मात्र मंगळवारपर्यंत तरी काँग्रेसची गट नोंदणी झालेली नव्हती.
उपनगराध्यक्ष पदावर चर्चा
पालिकेत 27 जागांवर बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद भाजपला मिळेल, हे निश्चित आहे. भाजपने या पदावर प्रत्येकी एक वर्षाप्रमाणे पाच नगरसेवकांना संधी देण्याचे नियोजन केले आहे. यात प्रामुख्याने अनेक नावां चर्चा असलीतरी महिला नगरसेवकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या वर्षासाठी प्रथम कुणाला संधी मिळेल? याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
कोरम पूर्तीसाठी कसरत होणार
राष्ट्रवादी शरद पवार गटाने पालिकेत 12 जागांवर विजय मिळवला होता. यानंतर आता अपक्ष उमेदवार राज विजय चौधरी हे राष्ट्रवादीच्या गटात गेल्याने संख्या 13 झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांनाही एका मताचा अधिकार असल्याने संख्या 14 वर पोहोचली आहे मात्र विशेष सभा व सर्वसाधारण सभेसाठी कोरम पूर्तीसाठी संख्याबळ नसल्याने आगामी काळात नगराध्यक्षांना कारभार चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

