जळगाव तालुक्यातील भोलाणे खुनाने हादरले : प्रौढाला जुन्या वादातून संपवले


Bholane village in Jalgaon taluka is shaken by a murder : An adult man was killed due to an old dispute जळगाव (15 जानेवारी 2026) : जुन्या वादातून जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे प्रौढाची चॉपरने हत्या करण्यात आली. मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवार, 14 जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. बाळकृष्ण सदाशीव कोळी (45) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव असून या हल्ल्यात बाळकृष्ण यांचा लहान मुलगा देखील जखमी झाला.

जुन्या वादातून खून
बाळकृष्ण सदाशिव कोळी (45, रा.भोलाणे, ता.जळगाव) व संशयित आरोपी आकाश रामकृष्ण कोळी यांच्यात जुना वाद होता. बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी भोलाणे येथील बस स्टँड परिसरात हा वाद पुन्हा उफाळून आला. रागाच्या भरात आकाश कोळी याने बाळकृष्ण यांच्यावर चॉपरने हल्ला चढवला. बाळकृष्ण यांच्यावर वर्मी तीन वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला होत असताना बाळकृष्ण यांचा लहान मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये धावला. यावेळी हल्लेखोराच्या चॉपरचा वार मुलाच्या हाताला लागल्याने तो जखमी झाला.

संशयीतांचा कसून शोध
बाळकृष्ण कोळी हे भोलाणे गावात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या खुनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी आणि जयेश व विशाल ही दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी मयत बाळकृष्ण यांचे भाऊ नरेंद्र सदाशिव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !