भुसावळात भाजपाकडून धक्कातंत्राचा वापर : शैलजा नारखेडे उपनगराध्यक्षपदी निवड निश्चित !
चर्चेतील नावे ऐनवेळी झाली गुल ः लेवा पाटील समाजाला प्रतिनिधीत्व
गणेश वाघ
भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेतील उपनगराध्यक्षपदासाठी आज गुरुवारी निवड प्रक्रिया होत आहे. या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार? याबाबत विविध नावांच्या चर्चा सुरू असताना मंत्री संजय सावकारे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत नगरसेविका शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचे नाव सूचवल्याची सूत्रांची माहिती आहे. सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर आता निवडीसाठी दुपारी 12 वाजता सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चर्चेतील नावे माघारी : ऐनवेळी नवीन चेहरा
भुसावळ पालिकेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया गुरुवार, 15 रोजी होत आहे. या पदांसाठी विविध नावांवर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत खलबते सुरू होती. भुसावळसाठी प्रिया बोधराज चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा राहिली तसेच भाजपा गोटातूनही तशी बातमी समोर आली मात्र मंत्री संजय सावकारे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत गुरुवारी शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर गुरुवारी नामनिर्देशनाची प्रक्रिया पार पडली.

तीन टर्मपासून नगरसेविका : पती दोन वेळा नगरसेवक
शैलजा नारखेडे यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्या 2011, 2016 व आताच्या 2025 मधील निवडणुकीत विजयी झाल्या आहेत तर त्यांचे पती पुरूषोत्तम नारखेडे हे 1996 व 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
लेवा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवार रजनी संजय सावकारे यांचा 1849 मतांनी पराभव झाला तर लेवा समाजाच्या उमेदवार गायत्री गौर-भंगाळे येथे विजयी झाल्या. भाजपाला बसलेल्या अनपेक्षित फटक्यानंतर व लेवा समाजाची मते विरोधात गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल व आगामी निवडणुकांची रणधुमाळी पाहता लेवा समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न मंत्री सावकारे यांनी येथे केल्याचे दिसून येते. लेवा समाजाला महिला उपनगराध्यक्ष तसेच तीन्ही स्वीकृत नगरसेवकदेखील लेवा समाजाचेच देण्यात आल्याने मंत्र्यांची दृरदृष्टी येथे दिसून येते.
असे आहेत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक
दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगसेवक पद या निकषानुसार भाजपाकडे 27 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने भुसावळात भाजपाच्या वाटेला तीन स्वीकृत नगरसेवकपदे मिळाली आहेत. त्यात नितीन बाबूराव धांडे, डॉ.प्रसाद वासुदेव बोंडे व संजयकुमार सुशीलकुमार नाहाटा यांना संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे.
संतोष दाढींची लागणार वर्णी
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष गटातील सहा नगरसेवकांसाठी एक नगरसेवक पद मिळणार आहे. या गटातर्फे संतोष दाढी चौधरी यांना संधी निश्चित झाली आहे.
माजी आमदार संतोष चौधरी स्वीकृत नगरसेवक
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे 14 नगरसेवकांची नोंदणी झाल्याने त्यांच्या वाटेला एक नगरसेवक पद मिळणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी हे स्वीकृत नगरसेवक होतील हे निश्चित आहे.

