भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शैलजा नारखेडे : हात उंचावून झाले मतदान
चार नगरसेवक तटस्थ : माजी आमदार चौधरींसह पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड
गणेश वाघ
Shailaja Narkhede elected as the Deputy Chairperson of Bhusawal Municipality: Voting was conducted by raising hands भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेतील उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली. भाजपाकडे संख्याबळ अधिक असताना उपनगराध्यक्षांची निवड बिनविरोध होईल ही शक्यता धूसर ठरली. राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सुनीता कृष्णधन कर यांचे तर भाजपातर्फे शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांचे नामांकन दाखल करण्यात आल्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी नारखेडे यांना 32 तर कर यांना 15 मते मिळाल्याने नारखेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माजी आमदार संतोष चौधरींसह पाच स्वीकृत सदस्यांचीही निवड झाली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी 12 वाजता निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख, ओएस अजित भट यांची उपस्थिती होती.

शैलजा नारखडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी गटनेता सचिन चौधरी यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली मात्र मुख्याधिकार्यांनी नियम वाचून दाखवत उपनगराध्यक्ष निवडीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात येईल, असे जाहीर केले. राष्ट्रवादीच्या सुनीता कृष्णधन कर यांच्या बाजूने राष्ट्रवादी गटातील 14 व अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरींनी हात उंचावून मतदान केले तर भाजपातर्फे शैलजा नारखेडे भाजपा गटातील 27 तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष मिळून पाच अशा मिळून 32 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
चार नगरसेवक तटस्थ
मतदान प्रसंगी काँग्रेसच्या नगरसेविका काजल मोरे व रोहन सूर्यवंशी तसेच अपक्ष नगरसेवक आसीफ खान व मानवी आहुजा यांनी तटस्थ म्हणून भूमिका वठवत सभागृहाचे लक्ष वेधले.
तीन टर्मपासून नगरसेविका : पती दोन वेळा नगरसेवक
शैलजा नारखेडे यांची ही तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्या 2011, 2016 व आताच्या 2025 मधील निवडणुकीत विजयी झाल्या आहेत तर त्यांचे पती पुरूषोत्तम नारखेडे हे 1996 व 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
लेवा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवार रजनी संजय सावकारे यांचा एक हजार 847 मतांनी पराभव झाला तर लेवा समाजाच्या उमेदवार गायत्री गौर-भंगाळे येथे विजयी झाल्या. भाजपाला बसलेल्या अनपेक्षित फटक्यानंतर व लेवा समाजाची मते विरोधात गेल्यानंतर डॅमेज कंट्रोल व आगामी निवडणुकांची रणधुमाळी पाहता लेवा समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न मंत्री सावकारे यांनी येथे केल्याचे दिसून येते. लेवा समाजाला महिला उपनगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत नगरसेवकदेखील लेवा समाजाचेच देण्यात आल्याने मंत्र्यांची दृरदृष्टी येथे दिसून येते.
पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड
यावेळी भाजपातर्फे नितीन बाबूराव धांडे, डॉ.प्रसाद वासुदेव बोंडे व संजयकुमार सुशीलकुमार नाहाटा यांना संधी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष गटातर्फे संतोष दाढी चौधरी यांना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे माजी आमदार संतोष चौधरी यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली.
राज्यगीताचा अपमान : जनभावना संतप्त
प्रांताधिकारी कार्यालयात निवड प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत व राज्यगीत मोबाईलवर लावण्यात आले. राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र गीत सुरू असताना अचानक मोबाईलमधून आवाज बंद झाल्याने पुन्हा राज्यगीत सुरू करण्यात आले मात्र काही वेळेत पुन्हा आवाज बंद झाल्यानंतर पुन्हा राज्यगीत लावण्यात आले. एकूण तीन वेळा राज्यगीताचा अपमान झाल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी संबंधितावर कारवाई करू व नोटीस बजावण्यात येईल अशी माहिती दिली.

