खडका येथे सार्वजनिक नाला बंद करण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध
Locals strongly oppose the closure of the public drain in Khadaka भुसावळ (15 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील खडका ग्रामीण भागातील सर्वे नंबर 192, बहुसंख्य परिसरांतर्गत येणार्या ईदगाह, मुस्लिम कॉलनी, अयान कॉलनी, जिया कॉलनी, एम. आय. तेली शाळा परिसरासह मोठ्या निवासी भागात सार्वजनिक सांडपाणी नाला एका व्यावसायिक व्यक्तीकडून खाजगी प्लॉट भरावासाठी बंद करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली.
गंभीर आजार पसरण्याची भीती
या नाल्यावर सुमारे दोन ते तीन हजार नागरिकांची वस्ती अवलंबून आहे. नाला बंद झाल्यास संपूर्ण परिसरात सांडपाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नाला बंद झाल्यास मलेरिया, डेंग्यू तसेच इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे या नाल्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून यापूर्वी मोठा पूल (ब्रिज) मंजूर करून उभारण्यात आला असून हा नाला सार्वजनिक वापराचा असल्याचे स्पष्ट होते तसेच सिटी सर्व्हेच्या नकाशामध्येही हा नाला दर्शविण्यात आला आहे. असे असतानाही खाजगी स्वार्थासाठी नाला बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येऊन विरोध दर्शविला आहे. संबंधित विभागांना याबाबत माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी आरोग्य विभाग तसेच सांडपाणी/स्वच्छता विभागाला लेखी निवेदन देण्याची तयारी दर्शविली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक राजेंद्र आवटे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की, सार्वजनिक नाल्याशी कोणतीही बेकायदेशीर छेडछाड होऊ दिली जाणार नाही. जे काही काम केले जाईल ते नियम व कायद्यानुसारच केले जाईल तसेच नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही खेळ होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांच्या आश्वासनानंतरही नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करून सार्वजनिक नाल्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. समस्येचे त्वरित निराकरण न झाल्यास लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

