उद्धव ठाकरेंना धक्का : तेजस्वी घोसाळकरांचा दणदणीत विजय


A setback for Uddhav Thackeray : Tejasvi Ghosalkar wins by a landslide मुंबई (16 जानेवारी 2026) : दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमधील लढतीकडे राज्याचे लक्ष होते. फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर राज्यभरात चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबातील राजकीय फाटाफुटीचं प्रतिबिंब या निवडणुकीत स्पष्टपणे दिसले मात्र दहिसरच्या जनतेने आपला कौल स्पष्ट करत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.

अचानक सोडली शिवसेना
तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर घोसाळकर कुटुंबातही मोठी चर्चा रंगली होती. भाजपकडून त्यांना दहिसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आणि त्याचवेळी ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार, हे स्पष्ट झालं. कारण, शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात थेट त्यांच्या मैत्रिणी असलेल्या धनश्री कोलगे यांना मैदानात उतरवलं. परिणामी ही निवडणूक केवळ दोन पक्षांमधील संघर्ष न राहता, मैत्री विरुद्ध मतभेद, निष्ठा विरुद्ध पक्षांतर आणि घरातील राजकीय मतभेद अशा अनेक पातळ्यांवर रंगली.

सुरूवातीपासून मतांमध्ये आघाडी
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी आघाडी घेतली होती. दुसर्‍या फेरीअखेर त्यांना 11,964 मतांची आघाडी मिळाली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांना केवळ 4,115 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. अंतिम निकालात ही आघाडी आणखी वाढली. तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण 16,484 मतांची कमाई करत 10,755 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी धनश्री कोलगे यांना 5,729 मतं मिळाली. या निकालाने दहिसर प्रभागात भाजपाचं वर्चस्व अधोरेखित झालं, तर ठाकरे गटासाठी ही लढत धक्कादायक ठरली.

आरोप-प्रत्यारोपांनी गाजली निवडणूक
या लढतीला वेगळी धार देणारी बाब म्हणजे दोन्ही उमेदवारांमधील वैयक्तिक नातेसंबंध. एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि धनश्री कोलगे या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान धनश्री कोलगे यांनी ही लढत निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवर दिसणारा चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशी असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी माध्यमांशी बोलताना ही निवडणूक केवळ पक्षांची नव्हे, तर विचारांची असल्याचा दावा केला होता मात्र प्रत्यक्ष मतदानात दहिसरच्या मतदारांनी वेगळाच कौल दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !