अपेक्षित यश मिळाले नाही मात्र मनसे संपली नाही : राज ठाकरे


We did not achieve the expected success, but MNS is not finished : Raj Thackeray मुंबई (17 जानेवारी 2026) : मुंबई महापालिकेत अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी खचून न जाता नव्या जोमाने उभं राहण्याचा निर्धार राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांची लढाई हीच मनसेचं अस्तित्व असल्याचं ठणकावून सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचे आवाहन केले.

सोशल मिडीयातून साधला संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्ते आणि समर्थकांशी थेट संवाद साधला आहे. सस्नेह जय महाराष्ट्र, अशा शब्दांत आपल्या पोस्टची सुरुवात करत त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं. यावेळची निवडणूक सोपी नव्हती, अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या बळाविरुद्ध ही लढाई होती, असे स्पष्ट करत त्यांनी या परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी दिलेल्या झुंजीचं कौतुक केलं.

धनशक्ती विरुद्ध सत्ताशक्ती अशी लढत
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये या निवडणुकीचं स्वरूप स्पष्टपणे मांडलं आहे. ही लढाई म्हणजे धनशक्ती आणि सत्ताशक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती, असं सांगत त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मैदान सोडलं नाही, यावर भर दिला. अशा कठीण लढाईत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि चिकाटी कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं. निकाल काहीही असले तरी कार्यकर्त्यांनी दिलेली झुंज ही पक्षासाठी मोठी ताकद असल्याचा संदेश त्यांनी दिला.

मराठी माणसाच्या विरोधात काही घडल्यास नगरसेवक पुरून उरणार
मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही, याचं दुःख असल्याचं राज ठाकरे यांनी मान्य केलं. मात्र, पराभवामुळे खचून जाण्याची मनसेची परंपरा नाही, हेही त्यांनी ठामपणे सांगितलं. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते आपल्या-आपल्या क्षेत्रात सत्ताधार्‍यांना पुरून उरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः मराठी माणसाच्या विरोधात काहीही घडत असल्याचं दिसल्यास, हे नगरसेवक सत्ताधार्‍यांना जेरीस आणतील, असं ठाम आश्वासन त्यांनी दिलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !