कंगणाचा पुन्हा हल्लाबोल : माझं घर तोडणारे सत्तेतून बेदखल
Kangana Ranaut attacks again : Those who demolished my house will be removed from power. मुंबई (17 जानेवारी 2026) : बृहन्मुंबई महापालिकेच्या निकालानंतर खासदार व अभिनेत्री खासदार कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताकाळात आपल्या घरावर झालेल्या कारवाईची आठवण काढत, बीएमसीमधील सत्ता परिवर्तन म्हणजे आपल्याला मिळालेला न्याय असल्याचं कंगनानं ठामपणे म्हटलं आहे. निकालाचे चित्र आल्यानंतर सोशल मिडीयात कंगणाने ठाकरेंबद्दल काढलेल्या उद्गाराचा व्हिडिओदेखील व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले होते.
ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला
बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत जोरदार मुसंडी मारली असून 25 वर्षे सत्तेत असलेला उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला पहिल्यांदाच ढासळला आहे. या निकालामुळे मुंबईतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. आता भाजपचा महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाची शिवसेना भाजपला साथ देणार असल्याने, मुंबई महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होईल. या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत असताना, खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोटची प्रतिक्रिया सर्वाधिक चर्चेत आली आहे.

माझे घर तोडणारे सत्तेतून बाहेर
बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मोठा फटका बसला असून, हे दोन्ही पक्ष मिळूनही सुमारे 75 जागांपर्यंतच मजल मारू शकले आहेत. याउलट भाजपने आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या निकालावर आनंद व्यक्त करत कंगना रनोट हिने सोशल मीडियावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. माझं घर तोडणारे आता सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत, असं म्हणत तिनं हा निकाल म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट संदेश असल्याचं म्हटलं आहे.
ती कारवाई तर द्वेषपूर्ण
कंगना राणौत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद राज्याला नवा नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, ती द्वेषपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला होता. याच पार्श्वभूमीवर बीएमसीतील सत्ता बदलाकडे कंगनानं वैयक्तिक न्यायाच्या दृष्टीने पाहिलं आहे. ज्यांनी मला शिव्या घातल्या, धमक्या दिल्या, माझं घर पाडलं आणि महाराष्ट्र सोडण्याची भाषा केली, आज महाराष्ट्रानेच त्यांना सोडलं, अशी जहरी प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे.

