भुसावळ पालिकेचे न.पा.रुग्णालयात बेकायदा स्थलांतर ! : गटनेता युवराज लोणारींचा आरोप

लोणारी उवाच : पालिकेला कोंडवाड्याची उपमा देणार्‍या ईमारतीत नागरिकांवर उपचार करणार का ? ; मनमानीविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा इशारा


गणेश वाघ
भुसावळ (17 जानेवारी 2026) : सत्ताधार्‍यांनी भुसावळ नगरपालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतराची प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली असून नगरपालिका दवाखान्यात तोडफोडही सुरू करण्यात आली आहे मात्र हे स्थलांतर पूर्णपणे बेकायदा असून मुख्याधिकार्‍यांची त्याला कुठलीही संमती नाही त्यामुळे या प्रकाराविरोधात आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडे सोमवारी तक्रार करणार असल्याची माहिती भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सत्ताधारी विरोधात भाजपा असा संघर्ष या माध्यमातून आता शहरवासीयांना पहायला मिळणार असल्याने सत्ताधारी नगराध्यक्ष आता काय भूमिका घेतात ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पालिकेचे बेकायदा स्थलांतर
मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गटनेता युवराज लोारी यांनी सत्ताधार्‍यांच्या कृतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सत्ताधार्‍यांनी पालिका नगरपालिका रुग्णालयात स्थलांतराचा घाट घातला असून त्यास मुख्याधिकार्‍यांची संमती नाही शिवाय नगरपालिका रुग्णालयात तोडफोडदेखील सुरू असून हा प्रकार पूर्णपणे बेकायदा आहे. गरुड परिवाराने एक एकर 20 गुंठे जागा केवळ रुग्णालयासाठी दिली असताना त्यात पालिका कार्यालय सुरू करणे चुकीचे आहे.

हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ
भुसावळातील पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय गोर-गरीब व सर्वसाधारण नागरिकांसाठी आशेचा किरण आहे. येथे भूलतज्ज्ञ नसल्याने केवळ प्रसुती होत नाही मात्र अन्य सुविधा मिळतात शिवाय विविध रक्त चाचण्यांचीदेखील सोय आहे. अवघ्या पाच रुपयांच्या केस पेपरमध्ये या सुविधा उपलब्ध होत असताना आता रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यास नागरिकांना रिक्षाचा खर्च परवडणार नाही. उलट पालिका दवाखान्यात सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना सत्ताधारी मात्र मनमानी करीत आहेत.

मग रुग्णांवर कोंडवाड्यात उपचार करणार का ?
माजी आमदार संतोष चौधरी यांनी पालिकेचे न.पा.रुग्णालयात स्थलांतर करताना कोंडवाड्यातून पालिका बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले होते व या वक्तव्याचा आधार घेत गटनेता लोणारी म्हणाले की, सत्ताधार्‍यांना पालिकेची इमारत कोंडवाडा वाटत असेल त्याच कोंडवाड्यात शहरातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दाखल करणार आहात का? हा प्रकार म्हणजे निव्वळ मनमानी असून त्या विरोधात भाजपा निश्चितपणे या प्रकाराला विरोध करेल व सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करेल. पालिका स्थलांतराने फारसा फरक पडणार नाही उलट कर्मचार्‍यांना कर वसुलीसाठी घरोघरी पाठवून कर वसुली करता येईल.

ईमारत उभारण्याचा प्रस्ताव द्या : आमचे मंत्री करतील मदत
पालिकेला ईमारत नसल्यास नवीन इमारत बांधकामासाठी 25 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळते. नगराध्यक्षांनी ही बाब सकात्मकतेने घेवून मंत्री संजय सावकारे यांना प्रस्ताव द्यावा, भाजपा या बाबीसाठी त्यांच्या सोबतच असेल मात्र बेकायदा स्थलांतर आम्ही खपवून घेणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

स्थलांतराचा घाट चुकीचा : उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या की, नगरपालिका स्थलांतराचा घाट पूर्णपणे चुकीचा आहे. दवाखाना हलवण्यात आल्यास नागरिकांची व रुग्णांची मोठी गैरसोय होईल व मुळातच दवाखान्याची जागा ज्या हेतूने दान करण्यात आली आहे त्या हेतूलाच हरताळ फासली जाईल.

शतकपूर्ती करणार्‍या दवाखान्याचे स्थलांतर वेदनादायी : पिंटू कोठारी
भुसावळ नगरपालिका दवाखान्याला गरुड परिवाराने 1 जानेवारी 1927 मध्ये साधारण एक एकर जागा दान दिली आहे. गरीबांवर गावातच उपचार व्हावे या उद्देशाने जागा दान करण्यात आली तसेच अनेक दात्यांनी त्यासाठीच सढळ हाताने मदत केली मात्र बेकायदेशीरपणे पालिका रुग्णालयांत स्थलांतरीत केली जात आहे. या दवाखान्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत असताना पालिका दवाखान्यात आणण्याचा प्रकार वेदनादायी आहे. शहरात वास्तविक सुसज्ज दवाखाने बांधणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले.

‘अमृत’चे काम थांबवणे अयोग्य
मध्यंतरी अमृतचे काम बंद करण्यात आल्याने आम्ही मुख्याधिकार्‍यांना जवाब विचारला मात्र त्यातही राजकारण आणले गेले मात्र काम बंद करणे अयोग्य असल्याचे लोणारी म्हणाले. पुढील आठवड्यात पीएमसीची बैठक होत असून त्यात निर्णय अपेक्षित आहे. जलकुंभाची जागा बदलली गेल्यास या भागातील नागरिकांची अडचणच वाढेल, असेही लोणारी यांनी सांगितले. विषय समिती निवडीतही भाजपाच्या सदस्यांची वर्णी लागेल, असा आशावाद लोणारींनी व्यक्त केला.

सत्ताधारी-विरोधकांमध्ये सुंदोपसुंदी
भुसावळात सत्ता बदल झाल्यानंतर भाजपा विरोधात सत्ताधारी असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे. आधी अमृतच्या कामाला ब्रेक तर आता पालिका स्थलांतरावरून वाद निर्माण झाला आहे तर आगामी काळातही हा संघर्ष असाच राहिल्यास त्याचा शहराच्या विकासावर निश्चितपणे परिणाम होईल, यात शंकाच नाही. जनहिताचा विचार करून निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा शैलेजा नारखेडे, जिल्हा सरचिटणीस व उपगटनेते परीक्षीत बर्‍हाटे, नगरसेवक निर्मल कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, नितीन धांडे, निक्की बत्रा, विशाल नाटकर, आशिष पटेल, पुरुषोत्तम नारखेडे, गुणवंत बोरोले, कैलास चौधरी, उदय पाटील, अल्बर्ट तायडे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !