भुसावळ-मुंबई व पुणे पॅसेंजर सुरू होणार का ? जीएम यांनी ‘खास शैलीत दिले’ हे उत्तर
विवेककुमार गुप्ता म्हणाले ; सेंद्रीय खत प्रकल्प सुरू करणार ; अवैध विक्रेत्यांची मुजोरी संपवणार ; भुसावळ-जळगाव तिसर्या व चौथ्या लाईनचे काम पूर्ण
गणेश वाघ
भुसावळ (17 जानेवारी 2026) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी शनिवारी भुसावळ विभागाचे वार्षिक निरीक्षण केले. सायंकाळी उशिरा डीआरएम कार्यालयातील ‘वसुंधरा’ हॉलमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोना काळापासून बंद पडलेली व हजारो चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी संजीवनी असलेली भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह भुसावळहून पुण्यासाठी पॅसेंजर सुरू करणार का? या प्रश्नावर त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर देत प्रवाशांनी आता वेळेची बचत करण्यासाठी पॅसेंजरचा मोह सोडावा, असे सांगून भविष्यात या पॅसेंजर गाड्या सुरू न होण्याचे संकेत दिले. प्रवाशांसाठी फास्ट मेमू गाड्या सुरू करण्यात आल्याने त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव-मनमाड तिसर्या लाईनचे काम पूर्ण
जीएम गुप्ता यांनी यावेळी सांगितले की, जळगाव-मनमाड या तिसर्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे शिवाय भुसावळ-जळगाव दरम्यानच्या तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आता पाचव्या रेल्वे लाईनच्या कामाला वेग आला असून अमृत भारत योजनेंतर्गत भुसावळसह अन्य रेल्वे स्थानकांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असल्याचे ते म्हणाले.

पॅसेंजर गाड्यांचा प्रवाशांनी मोह सोडावा
भुसावळ-मुंबईदरम्यान धावणारी पॅसेंजर कोरोना काळानंतर सुरूच झाली नसल्याच्या प्रश्नावर जीएम यांनी पॅसेंजर गाड्यांऐवजी आता मेमू सुरू करण्यात आल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांनी आता फास्ट ट्रेनने प्रवास करावा, असे सांगून ते म्हणाले की, मुळातच रेल्वे व प्रवाशांकडेदेखील वेळ नाही त्यामुळे त्यांनी आता फास्ट ट्रेनने प्रवास करून पॅसेंजर गाड्यांचा मोह सोडावा.
अवैध विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई होणार
रेल्वेच्या झेडटीएस बोगद्याची दुरुस्ती व रेल्वे स्थानकावरील तसेच रेल्वे गाड्यांमध्ये चालणार्या अवैध विक्रेत्यांबाबत प्रश्न विचारल्यानंतर जीएम यांनी सातत्याने या प्रश्नी कारवाई होत असल्याचे सांगून यापुढे अधिक कारवाई होणार असल्याचे सांगितले. डीआरएम अग्रवाल यांनी याबाबत कारवाईचा जोर वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
रेल्वे प्रशिक्षण संस्थेतील प्रकार दुर्दैवी मात्र कारवाईबाबत मौन
भुसावळच्या रेल्वे प्रशिक्षण संस्थेतील शेकडो कर्मचार्यांना अन्नातून विषबाधा झाली मात्र रेल्वे प्रशासनाने अत्यवस्थ कर्मचार्यांचा आकडा लपवला व संबंधित दोषींवर काय कारवाई केली? यावर ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने लक्ष वेधले असता जीएम यांनी घडलेली घटना निश्चितपणे दुर्दैवी असल्याचे म्हणत या प्रकरणी अन्नाचे नमूने घेतल्याने त्यात दोष आढळल्याचे मान्य केले तसेच उपचारासाठी मुंबईहून पथक पाठवल्याची माहिती दिली. दोषींवर काय कारवाई केली? याबाबत त्यांनी मात्र चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सेंद्रीय खत प्रकल्प सुरू होणार
जीएम यांनी रेल्वे प्रवाशांनी स्थानकावर स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले तसेच केळीमुळेच स्थानकावर कचरा अधिक होत असल्याचे सांगितल्यानंतर माध्यम प्रतिनिधीने रेल्वेने खतापासून कचरा बनवण्यासाठी सेंद्रीय खत प्रकल्प सुरू केला मात्र गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंद असल्याचे लक्षात आणून दिल्यावर जीएम यांनी लवकरच हा प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले.
मेमू शेडचे कार्य प्रगतीपथावर
रेल्वे जागेवरील मेमू शेडची सद्यस्थिती विचारल्यानंतर जीएम यांनी काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत तीन महिन्यात काम पूर्णत्वास येईल, असे सांगितले तर पीआरओ स्वप्नील नीला यांनी देशभरात वंदे भारतही ट्रेन सुरू झाल्याने या ट्रेनच्या कोचच्या दुरुस्तीसाठी शेडचा विस्तारही करता येईल, असे सांगितले.

