वरणगावातील नगरसेवकांच्या पुढाकारामुळे आसरा माता मंदिर परिसराची स्वच्छता


वरणगाव (18 जानेवारी 2026) : शहरातील विविध भागांत गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झालेल्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच माघ महिना सुरू होत असल्याने खंगार समाजाचे दैवत असलेल्या आसरा माता मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नगरसेवकांच्या पुढाकाराने पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या स्वच्छतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

रविवारपासून माघ महिना सुरू होत असून या कालावधीत खंगार समाजाच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या आसरा माता मंदिरात पंधरा दिवस नियमित पूजाविधी केले जातात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर परिसर झाडाझुडपांनी वेढला गेला होता. यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंदिर परिसराची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र, याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते.

अखेर नगरसेविका माधुरी हळदे, वंदना पाटील तसेच नगरसेवक निलेश खाचणे यांनी मंदिराचे धार्मिक महत्त्व व परिसरातील अस्वच्छतेबाबत उपमुख्य अधिकारी रशीद नवरंगबादी यांचे लक्ष वेधले. त्यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या वतीने तत्काळ जेसीबी पाठवून झाडाझुडपांची साफसफाई करण्यात आली व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छतेमुळे माघ महिन्यातील पूजाविधी निर्बंधाविना पार पडणार असून खंगार समाजातील भाविकांनी नगरसेवक व पालिका प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !