युट्यूबवरून सूचली एटीएम मशीन फोडण्याची संकल्पना : धुळ्यासह शिरपूर, अमळनेरातील एटीएम फोडणारे खान्देशातील चोरटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात
चोरट्यांचा पोलिसांकडून पाऊण तास सिनेस्टाईल पाठलाग : चार गुन्ह्यांची उकल : आरोपींना पाच पोलिसांची पोलिस कोठडी
The thieves from Khandesh who broke into ATMs in Dhule, Shirpur, and Amalner have been caught by Shirpur police शिरपूर (18 जानेवारी 2026) : झटपट श्रीमंत होण्यासाठी सोशल मिडीयातील युट्यूबवर एटीएम फोडण्याची कल्पना सूचली. त्यासाठी पिकअप वाहनासह चोरीसाठी लागणारे साहित्य दोघांनी खरेदी केले. अमळनेरात एटीएम साखळीने उचलताना धाडकन झालेल्या आवाजाने नागरिक जागे झाल्यानंतर चोरट्यांना आल्या पावली परतावे लागले तर धुळ्यातही असाच प्रकार घडल्यानंतर चोरट्यांनी शिरपूरात मोर्चा वळवला मात्र यावेळी सतर्क रिक्षा चालकाने 112 वर माहिती दिल्यानंतर सतर्क यंत्रणेने पाऊण तास आरोपींचा पाठलाग केल्यानंतर त्यांना अटक करण्यात यश आले. अटकेतील आरोपी धुळ्यासह पारोळा तालुक्यातील रहिवासी आहेत.
आरोपींना पाच दिवसांची कोठडी
हेमंत सुकलाल माळी (21, भिरडई, धुळे) व विदुर उर्फ विजय देवा जाधव (40, वसंतनगर, पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी अमळनेरात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तसेच धुळे शहर हद्दीतील एचडीएफसी बँकेचे दोन एटीएम फोडण्याचा गुन्हा उघडकीस आला तर शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील बंँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडत असताना पाठलाग करून त्यांना अटक करण्यात आली हे विशेष !

सिनेस्टाईल पाठलाग अन् आरोपी जाळ्यात
शनिवार, 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 02.15 वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळताच त्यांनी धाव घेतली मात्र पोलिस येण्याची भनक लागताच संशयीत वाहनासह पसार झाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. शिरपूर तालुका व थाळनेर पोलिसही अलर्टवर असल्याने आरोपींचा मध्यप्रदेशात पळण्याचा मार्ग बंद झाला तर आरोपींनी पोलिसांना पाहून थेट शहादा फाट्याकडे पलायन केले. शिरपूर तालुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे व थाळनेर एपीआय हेमंत पाटील यांनीही आरोपींचा पाठलाग केला.
धुळे जिल्ह्यात अलर्ट
मुंबई-आग्रा महामार्गावर नाकाबंदीवरील बॅरिकेट्स उडवत आरोपी दहिवद गावात शिरले व महामार्गावर आल्यानंतर त्यांनी पाठशिवणीचा खेळ सुरू केला. पिकअपला बांधलेली 20 फूटाची लोखंडी साखळी रस्त्यावर घासली गेल्याने चिंगार्या उडत होत्या मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग कायम ठेवला व आरोपींनी चालत्या वाहनातून उड्या मारून पळ काढला मात्र तपासचक्र फिरताच आरोपींना अटक करण्यात यश आले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे, हवालदार रवींद्र आखडमल, राजेंद्र रोकडे, कॉन्स्टेबल आरीफ तडवी, सचिन वाघ, जितेंद्र अहिरराव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंके, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, चालक रवींद्र महाले अशांनी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

