देशभरातील कुलींना रेल्वे सेवेत वर्ग करा : भुसावळात जीएम विवेक कुमार गुप्तांना ‘साकडे’
Integrate porters across the country into railway service: A request made to GM Vivek Kumar Gupta in Bhusawal भुसावळ (18 जानेवारी 2026) : रेल्वेच्या आधुनिकीकरणामुळे तसेच अत्याधूनिक सोयी-सुविधांमुळे देशभरातील रेल्वे स्थानकांवर काम करणार्या कुली बांधवांना काम मिळेनासे झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर 2008 प्रमाणे देशभरातील सर्व कुली बांधवांना रेल्वेच्या स्थायी सेवेत वर्ग करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भुसावळ विभागाच्या दौर्यावर आलेल्या महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे शनिवार, 17 रोजी करण्यात आली. राष्ट्रीय कुली मोर्चाचे भुसावळ को ऑर्डीनेटर अनिल सावळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन गुप्ता यांना देण्यात आले.
सोयी-सुविधांमुळे कुलींवर उपासमारीची वेळ
रेल्वेच्या अत्याधूनिकीकरणासोबतच रेल्वे स्थानकावर अत्याधूनिक एक्सलेटर, लिप्ट तसेच बॅटरीवरील गाड्या आल्याने कुली बांधवांना आता रोजगार मिळेनासा झाला आहे परिणामी कुली बांधवांना घर चालवतानाही नाकेनऊ येत आहे. अशा पार्श्वभूमीवर देशभरताील कुली बांधवांची रेल्वे सेवेत समायोजन केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय कुली मोर्चाने आतापर्यंत अनेकदा आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने 19 जून 2025 रोजी सर्व रेल्वे प्रबंधकांना निर्देश दिले होते मात्र नेमकी याबाबत काय दखल घेण्यात आली? याबाबत कुली बांधवांना कुठलीही सूचना वा निर्देश मिळाले नाही. रेल्वे मंत्रालयाच्या तपासणी अहवालानुसार सामाजिक सुरक्षा संदर्भात कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
सन्मानजनक जीवन जगण्यासाठी सुविधा द्याव्यात
रेल्वे कुली बांधवांना सन्मानजनक जीवन जगता येण्यासाठी त्यांची सेवा रेल्वेच्या स्थायी सेवेत वर्ग करावी, सामाजिक सुरक्षा उपाय सुनिश्चित करावेत, मुलांना मोफत शिक्षणाची सोय मिळावी, परिवारासाठी मेडिकल उम्मीद कार्डद्वारा सेवा मिळाव्यात, कुली बांधवांसाठी विश्रामगृहासह पासची व्यवस्था व्हावी, वृद्ध कुलींना पेन्शन सुरू करावेत आदी मागण्या करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
जीएम यांना निवेदन देताना राष्ट्रीय कुली मोर्चा मुंबई झोनचे को ऑर्डीनेटर अनिल सावळे, विजय किरतकुळे, वसीम शेख, अबरार शेख, विष्णू सोनवने, हेमंत जाधव आदींसह कुली बांधवांची उपस्थिती होती.

