सिंधुदुर्गात महायुतीनंतर भाजपामध्ये बंडाचे निशाण फडकले : 43 प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामे
In Sindhudurg, a rebellion has erupted within the BJP after the grand alliance: 43 key office-bearers have resigned सिंधुदुर्ग (19 जानेवारी 2026) : सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये बंडाचे निशाण फडकू लागले असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती होताच 43 प्रमुख पदाधिकार्यांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.
पदाधिकार्यांची बैठक
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला युती न केल्यामुळे मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये असा फटका महायुतीला बसू नये यासाठी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी नुकतीच महायुतीच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत तसेच पदाधिकार्यांसोबत कणकवलीत बैठक आयोजित केली. या बैठकीत खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच 43 प्रमुख पदाधिकार्यांनी सामूहिकरित्या राजीनामे दिल्याची माहिती असून या अंतर्गत नाराजीने भाजपसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीची घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली. ही घोषणा केल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालंय. ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सोपवला. या निर्णयापाठोपाठ ओरोस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकार्यांनीही सामूहिक राजीनामे देऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
राजीनामा देणार्यांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, युवा मोर्चाचे जयेश चिंचळकर आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सुनील जाधव यांसारख्या महत्त्वाच्या एकूण 43 पदाधिकार्यांनी, ज्यात बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्रप्रमुखांचाही समावेश आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक?
राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होऊन 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे.







