मुंबईच्या महापौरपदासाठी जोरदार हालचाली : शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात ?
मुंबई (19 जानेवारी 2026) : मुंबईत महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून राजकारण मोठ्या रंजक वळणावर पोहोचल्याचे चित्र आहे. भाजपासह शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले असले तरी काठावरचे बहुमत मिळाल्याने मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंचे काही नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर ाली असून तसे झाल्यास मुंबईच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपाने 89 जागांवर मिळवला विजय
बीएमसी निवडणुकीत भाजपने 89 जागांवर विजय मिळवला असून, त्यांना 114 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची मदत अनिवार्य आहे. हीच संधी साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसमोर अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता व्आहे. त्यातच जर ‘देवाची’ इच्छा असेल तर मुंबईचा पुढचा महापौर आपलाच असेल, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शिंदेंच्या नगरसेवकांची मातोश्रीवर फोनाफोनी?
‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, शिंदे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहितीआहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीला फोन करून आमच्या मनात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही वैर नाही, असे स्पष्ट केल्याचे समजते. या गुप्त वाटाघाटींची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने आपल्या नगरसेवकांची रवानगी हॉटेलमध्ये केली असून महापौर निवडीपर्यंत त्यांना तिथेच ठेवले जाणार आहे.
पडद्यामागे बर्याच गोष्टी घडतायत : राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेत अनेक सूचक विधाने केली आहेत. ते म्हणाले, मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल, शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. रविवारी मी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बर्याच गोष्टी घडत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.







