भुसावळातील श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात पालिका स्थलांतरास भाजपाचा विरोध : प्रांत कार्यालयात मांडला पदाधिकार्यांनी ‘ठिय्या’
मुख्याधिकार्यांच्या पाहणीनंतर तात्पुरता पालिका रुग्णालयात तोडफोडचे काम थांबले : पुढील कारवाईकडे लागले लक्ष
भुसावळ (19 जानेवारी 2026) भुसावळ पालिका थेट श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात हालचाली सुरू झाल्यानंतर शहरात राजकीय वातावरण तापले. विषय समिती सभेनंतर भाजपेयींनी थेट प्रांताधिकार्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने सोमवारी भुसावळातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकार्यांकडेही आता तक्रार करण्यात आली तर तूर्त मुख्याधिकार्यांच्या पाहणीनंतर काम थांबवण्यात आल्याने आता सत्ताधारी व प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पालिका प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन
नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार आणि दप्तर संत गाडगेबाबा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक व नगरसेविकांनी थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठत सोमवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. ‘संत गाडगेबाबा रुग्णालय वाचवा’ या घोषणा देत भाजपने प्रशासनाचा निषेध नोंदविला.

मुख्याधिकार्यांना विचारला जाब
भाजपने या प्रकरणी गंभीर आरोप करत सांगितले की, नगरपरिषदेने या स्थलांतरासंदर्भात कोणताही ठराव मंजूर केलेला नाही तसेच अधिकृत आदेशही काढलेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारभार राबविला जात आहे. हा निर्णय बेकायदेशीर, मनमानी आणि लोकहिताच्या विरोधात असल्याचे सांगत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना जाब विचारण्यात आला.
भाजपाकडून प्रशासन धारेवर
उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या दालनात झालेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले होते. भाजपच्या महिला नगरसेविकांनीही प्रचंड आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकार्यांना थेट सवाल केले. रुग्णालय हे उपचारासाठी असते की कार्यालयीन फाईलींसाठी? असा थेट प्रश्न उपस्थित करत भाजपने प्रशासनाला धारेवर धरले.
तोंडी आदेशानंतर तात्पुरता कामे थांबले
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तोंडी आदेश दिल्यानंतर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी तत्काळ अभियंत्यांसह संत गाडगेबाबा रुग्णालयाला भेट दिली. तेथे सुरू असलेले तोडकाम तातडीने थांबविण्यात आले. पुढील निर्णयासाठी मुख्याधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झाले.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात भाजपचे गटनेते युवराज लोणारी, उपगटनेते परिक्षित बर्हाटे, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांच्यासह नगरसेवक पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, पिंटू ठाकूर, किरण कोलते, सुजित भोळे, नितीन धांडे, आशिष पटेल, दीपक धांडे, बबलू बर्हाटे, विशाल नाटकर, सोनल महाजन, तसेच नगरसेविका शोभा इंगळे, अनिता सपकाळे, मेघा वाणी, प्रिया चौधरी, प्राची पाटील, छाया देशमुख, आशा पाटील, सोनम इंगळे, अर्चना सातदिवे यांच्यासह डॉक्टर प्रसाद बोंडे, संजय नाहटा, संतोष चौधरी (दाढी) आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन
भुसावळातील संत गाडगेबाबा रुग्णालय हे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवन रेषा आहे. त्याच्या अस्तित्वावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. प्रशासनाने तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.







