शिवसेना व राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर उद्या निर्णय
मुंबई (20 जानेवारी 2026) : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी बुधवार, 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. या सगळ्या प्रकरणावर अॅड.असीम सरोदे यांनी एक्सवर ट्विट केलं आहे.
असिम सरोदे काय म्हणाले?
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रिच होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न- जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल.
उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल, असे सरोदे यांनी म्हटलं आहे.







