मुंबईत भाजपाचा महापौर निश्चित ; 30 रोजी स्वीकारणार सूत्रे
मुंबई (20 जानेवारी 2026) : मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. यानिमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते सध्या दिल्लीत आहेत. याच नेत्यांच्या गोटातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती आहे.
भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक
यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असल्याने भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे मात्र भाजपची गरज ओळखून शिंदेंच्या शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पहिल्या अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद आणि स्थायी व बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याची चर्चा आहे मात्र भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाने शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

महापौर पदाबाबत तडजोड नाहीच
मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मित्रपक्षांना समजावून सांगा, असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता. यानंतर काहीवेळातच दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गोटातून येत्या 30 जानेवारीला भाजप मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवून राज्यरोहण करेल, अशी माहिती समोर आली आहे.
या सगळ्या घडामोडींबाबत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी भाष्य करताना म्हटले की, आजघडीला देशाचे सरासरी वय 28 इतके आहे. पंतप्रधान मोदी यांनी युवा पिढीला पुढे आणण्याचे काम केले आहे. स्टॅण्डअप इंडिया, स्टार्टअप इंडियासारखे उपक्रम आणले. आज भाजपचा तरुण अध्यक्ष पदभार स्वीकारणार आहे. कुठलीही तडजोड करण्याचा प्रश्नच नाही. महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.







