ईव्हीएमवर पुन्हा शंका : जळगावात पराभूत उमेदवार म्हणाल्या ; मी स्वतःलाच मत दिले नाही का ?
EVMs questioned again: The defeated candidate in Jalgaon asked, “Did I not even vote for myself?” जळगाव (20 जानेवारी 2026) : विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार आरोप होताना दिसतात व बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जाते. जळगावात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एका उमेदवाराला चक्क शून्य मते मिळाल्यानंतर त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करीत मी स्वतःलाही मतदान केले नसेल का? असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे.
काय आहे नेमका प्रकार ?
जळगावातील प्रभाग क्रमांक 1-अ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला थेट 0 म्हणजेच शून्य मते मिळाल्याचे निकालात समोर आले. या निकालाने केवळ जळगावच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला. सुनंदा फेगडे यांचा साधा, पण थेट प्रश्न आहे मी स्वतःला तरी मतदान केलं नव्हतं का? घरातील लोकांनी मतदान केलं की नाही, हा वेगळा मुद्दा असू शकतो मात्र स्वतः उमेदवाराने स्वतःला दिलेलं मतही निकालात शून्य कसं दिसू शकतं, याचं उत्तर कोण देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला

हा आरोपांना बळ देणारा निकाल
या मुद्यावरून त्यांनी ईव्हीएम प्रणालीवर संशय व्यक्त केला असून, ही घटना म्हणजे ईव्हीएममधील संभाव्य गडबडीचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. बामसेफ, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी देशभरात वारंवार ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्या. जळगावातील हा निकाल त्याच आरोपांना बळ देणारा असल्याचे फेगडे यांचे म्हणणे आहे.
मग माझे मत कुठे गेले ?
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनंदा फेगडे यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. माझ्या घरातल्या लोकांची मतं जाऊ द्या; पण माझं स्वतःचं मत मी मला दिलं होतं. मग ते मत कुठे गेलं? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. मत ईव्हीएममध्ये जातं की निकाल थेट भाजपकडे जाते? असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयोग शांत राहतो आणि स्पष्टीकरण मात्र सत्ताधारी पक्षाकडून येतं, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या. ईव्हीएम सरकारी आहे, निवडणूक आयोग घटनात्मक आहे; पण खुलासा पक्षीय पातळीवरून दिला जातो-ही आजच्या लोकशाहीची शोकांतिका आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.







