दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी यांचा दुहेरी सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्य पुरस्कार तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून गौरव
International Business Coach Dilip Auti दावोस/ झुरीच (स्वित्झर्लंड) (24 जानेवारी 2026) : महाराष्ट्रातील उद्योजकता आणि नेतृत्वाचा जागतिक पातळीवरील ठसा अधोरेखित करणारा गौरवास्पद क्षण दावोस येथे अनुभवायला मिळाला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत आयोजित लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.
दिलीप औटी यांचा प्रवास हा संघर्ष, सातत्य आणि आत्मनिर्मितीचे प्रतीक मानला जातो. सामान्य पार्श्वभूमीतून व्यवसायाची सुरुवात करत त्यांनी स्वतः उद्योजक म्हणून अनुभव घेतला. त्याच अनुभवांच्या बळावर पुढे त्यांनी बिझनेस कोच म्हणून काम सुरू केले. आजपर्यंत हजारो उद्योजक, व्यावसायीक आणि तरुणांना मार्गदर्शन करत त्यांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मूळ कार्यक्रमासाठी दावोस येथे उपस्थित असताना त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ग्लोबल इम्पॅक्ट फोरमसाठी खास आमंत्रण देण्यात आले. या मंचावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिलीप औटी यांना मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यांचा स्वतंत्रपणे सन्मान व गौरव केला.
या भेटीदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लंडन येथे होणार्या मराठी उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाबाबत दिलीप औटी यांच्याशी चर्चा केली आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केले. महाराष्ट्रातील उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.

दावोससारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मंचावर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या हस्ते झालेला हा दुहेरी सन्मान केवळ वैयक्तिक नसून, महाराष्ट्रातील उद्योजकता, नवकल्पना आणि नेतृत्वक्षमतेस मिळालेली जागतिक मान्यता असल्याचे मानले जात आहे. दिलीप औटी यांचा हा प्रवास अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

