शिंदे गटाची सावध भूमिका : भाजपासोबत गट नोंदणीचा प्रस्ताव फेटाळला ; स्वतंत्र नोंदणीची भूमिका
Shinde faction adopts a cautious stance : Proposal for group registration with BJP rejected; opts for independent registration. मुंबई (27 जानेवारी 2026) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळत स्वतंत्र गट नोंदणीची तयारी चालवली आहे. आगामी पाच वर्ष भाजपच्या दबावात राहण्यापेक्षा आपल्या वाट्याला येईल ते स्वीकारून स्वतःचे अस्तित्व जपायचे, ही या मागची शिंदे गटाची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे.
भाजपासोबत जाण्याचा प्रस्ताव धुडकावला
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत. पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील अशी माहिती होती पण आता शिंदे गट स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणी करणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील शिंदे गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे जाऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने या प्रकरणी भाजपसोबत मिळून एकच गट स्थापन करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

भाजपसोबत सुरू होत्या वाटाघाटी
भाजप व शिंदे गटात सध्या बीएमसीच्या महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासह सदस्य संख्येप्रकरणी चर्चा सुरू होती. विशेषतः या प्रकरणी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमधील सदस्य संख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांची सदस्यसंख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे.
शिंदे गटाने भाजपचा धोका ओळखला?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटाची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधार्यांचा एक सदस्य वाढू शकतो पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप – शिंदे गटाचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्वच समित्यांत भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदे गटाला अनिवार्यपणे पाठिंबा द्यावा लागेल. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर समित्यांवर शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहण्याचा धोका होता.
अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट
सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 व शिंदे गटाचे तीन सदस्य जाण्याची शक्यता आहे. पण संयुक्त गट झाल्यास शिंदे गटाचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचे सर्वाधिकार भाजपकडे गेले असते. यामुळे शिंदे गटाने स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे महापालिकेत सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून काम करणार असले तरी सत्तेतील समतोल व समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







