बांगलादेशींवर कारवाईदरम्यान पोलिसांची लूट : सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह पाच जणांवर गुन्हा
मुंबई (27 जानेवारी 2026) : बांग्लादेशींवर कारवाई करण्याच्या नावाखाली खाकी वर्दीतील दरोडेखोरांचा नवी मुंबई आणि कल्याण परिसरात उच्छाद पाहायला मिळत आहे. बांगलादेशींविरोधातील कारवाईचा फायदा घेत त्यांनाच लुटणार्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारवाईच्या नावाखाली घरात घुसून रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे 25 ते 30 लाखांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार चेंबूरच्या आरसीएफ पोलिस तपासात उघडकीस आला.
काय आहे प्रकरण ?
नवी मुंबईतील एका बारमध्ये काम करणारी अस्मा पॉली (मूळची बांगलादेशी) ही 2 जानेवारी 2026 रोजी कोपरखैरणे येथील तिच्या घरी असताना, साध्या वेशात काही पोलिस एका एजंटसह तिच्या घरी आले. त्यांनी अस्माची चौकशी केली आणि तिला बळजबरीने पोलिसांच्या गाडीत बसवले. अस्मा गाडीत असताना पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली मात्र पोलिस ठाण्यात नेल्यानंतर अस्माला तिच्या बहिणीकडून समजले की, घरातील सर्व सामान गायब आहे. अस्माच्या दाव्यानुसार, पोलिसांनी तिच्या घरातून 15 तोळे सोने आणि 20 ते 25 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.

एजंट आणि बार मालकाचा मध्यस्थीसाठी वापर
लूट केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने पोलिसांनी अस्मा काम करत असलेल्या बारच्या मालक रमेश अण्णाला मध्यस्थीसाठी बोलावले. पोलिसांनी चोरलेल्या रकमेपैकी केवळ 5 ते 6 लाख रुपये आणि काही दागिने बार मालकाकडे सुपूर्द करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच शिपाई खांडके याने अस्माला याबद्दल कुणालाही काही सांगायचे नाही, अशी धमकीही दिली मात्र आपल्या कष्टाची मोठी रक्कम आणि दागिने गेल्याने अस्माने हिंमत करून आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासात समोर आले धक्कादायक वास्तव
तपासादरम्यान समोर आले की, याच पोलिस पथकाने 25 डिसेंबर 2025 रोजी कल्याणमधील शर्मिण खातून या बांगलादेशी महिलेच्या घरात घुसून तिलाही कारवाईची भीती घातली आणि पाच लाख रुपये उकळले होते. पोलिसांसोबत एक अज्ञात एजंट असायचा, जो बांगलादेशींच्या घरांची माहिती काढून त्यांना घाबरवण्याचे काम करायचा. आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ऑनलाईन दिले आहे.







