विमान अपघाताची चौकशी होणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
An inquiry will be conducted into the plane crash : Deputy Chief Minister Eknath Shinde मुंबई (28 जानेवारी 2026) : बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला असल्याची भावना व्यक्त करीत अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे. या दुर्दैवी अपघाताची चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
अपघाताची चौकशी व्हावी
आमच्या सहकार्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे. पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे, आणि तसेच या अपघाताची चौकशीदेखील होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना
मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल. अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर असे म्हणणारे ते होते, ते मनाने अतिशय निर्मळ होते, त्याचा अनुभव मी घेतला आहे, असंही एकनाथ शिंदे पुढे म्हणालेत.
अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे
त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं, मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना इतर कोणत्याही योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी किंवा आर्थिक तरतूद आहे ती अतिशय उत्कृष्टपणे आणि उत्तमपणे अजित पवारांनी त्यावेळी संभाळली. त्यांच्या कामाचा चांगला अनुभव मला आहे, एकदा करायचं ठरवलं की अजित दादा ते करायचे, करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते, चांगला असेल तर काय करायचं तर करायचं म्हणायचे, जे वाईट आहे त्याला स्पष्टपणे नाही म्हणायचे, असा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे, मी असेन किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या तरी आम्ही पहाटेपर्यंत काम करायचो, अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे, अजित दादांनी पहाटे सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिल्या होत्या, त्यांच्या कामाचा अनुभव लोकप्रतिनिधींना आणि अधिकार्यांना देखील आहे. वेळेचे महत्व आणि भान ठेवून ते काम करायचे, असा नेता हरपला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.







