‘अजित पवार अमर रहे, परत या, परत या’ च्या घोषणा ; अंत्ययात्रेला सुरूवात


बारामती (29 जानेवारी 2026) : बारामतीला जोडणार्‍या रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून मिळेल त्या साधनांनी समर्थक, कार्यकर्ते व नागरिक येथे दाखल होत आहेत. अजित पवारांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक दाखल झाले आहेत. अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आल्यानंतत दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
अजित पवार यांच्या पार्थिवावर लवकरच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील. संपूर्ण महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ उपस्थित आहे.

विमान अपघातात दादांसह पाच जणांचा मृत्यू
बारामतीत बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव यांचाही मृत्यू झाला.

घोषणांनी परिसर दणाणला
बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात सकाळी 9 वाजेपासूनच अलोट गर्दी उसळली होती. 9.45 वाजता अजितदादांचे पार्थिव रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘अजितदादा अमर रहे, अजित पवार अमर रहे’, ‘अजित पवार परत या, अजित पवार परत या’ ‘एकच वादा, अजितदादा’ अशा घोषणा सुरू होत्या.

सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आल्यानंतर भावुक वातावरण
अजित पवारांचा मृतदेह स्ट्रेचरवर ज्या वेळी उत्तर तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आला होता त्या वेळी उपस्थित जनसुमदाय अक्षरश: हुंदके देऊन रडत होता. श्रीनिवास पवार सर्वांचे सांत्वन करताना दिसून आले. दुपारी 2 ते 2.15 च्या सुमारास सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेव्हा सर्वजण अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !