सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मोफत सॅनिटरी पॅड’ निर्णयाचे जळगावच्या निधी फाऊंडेशनकडून स्वागत !
The Supreme Court’s ‘free sanitary pads’ decision is welcomed by the Nidhi Foundation of Jalgaon! जळगाव (30 जानेवारी 2026) : शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय म्हणजे मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाच्या चळवळीतील एक मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दशकाभराच्या कार्याला मिळाली पावती
निधी फाऊंडेशन गेल्या 10 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मासिक पाळी या विषयावर जनजागृती करत आहे. संस्थेच्या वतीने ’मासिक पाळी कापडमुक्त अभियान’ राबवून हजारो मुलींना सुरक्षित आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच शासकीय कार्यालये आणि शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेने केले आहे.
मुलींच्या शिक्षणातील अडथळा दूर होणार
वैशाली विसपुते म्हणाल्या की, न्यायालयाने शिक्षण हा ’मल्टीप्लायर राईट’ असल्याचे सांगत मासिक पाळीच्या सुविधांना मानवी प्रतिष्ठेशी जोडले आहे. अनेकदा शाळांमध्ये सोयीअभावी मुलींचे शिक्षण सुटते किंवा त्या गैरहजर राहतात. आता सर्व शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे, साबण-पाणी आणि मोफत ऑक्सो-बायोडिग्रेडेबल पॅड उपलब्ध झाल्यामुळे मुली आत्मविश्वासाने शाळेत जाऊ शकतील.
पुढील पाऊल : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
शाळांप्रमाणेच रेल्वे आणि विमानांसारख्या सार्वजनिक प्रवास व्यवस्थेतही महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत, यासाठी निधी फाऊंडेशन सातत्याने पाठपुरावा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या दिशादर्शक निर्णयामुळे आगामी काळात सार्वजनिक ठिकाणीही अशा सुविधा मिळतील, अशी आशा विसपुते यांनी व्यक्त केली आहे.
