भुसावळात तक्रार निवारण दिनाला प्रतिसाद : सामंजस्याने 42 प्रकरणांचा निपटारा

90 तक्रार अर्जांवर झाली सुनावणी : किरकोळ वाद जागीच मिटले


Positive response to the grievance redressal day in Bhusawal : 42 cases resolved amicably.भुसावळ (31 जानेवारी 2026) : पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवण्यासाठी तसेच प्रलंबित अर्जांचा जलद निपटारा करण्यासाठी शनिवार, 24 रोजी भुसावळ विभागात तक्रार निवारण दिन राबवण्यात आला. या मोहिमेंतर्गत शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलीस ठाण्यात एकूण 90 तक्रार अर्ज सुनावणीसाठी आले होते. यापैकी 42 अर्जांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समन्वय घडवून आणत ते निकाली काढण्यात आले तर उर्वरित 48 अर्जांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून ते सध्या प्रलंबित आहेत.

जागीच मिटले वाद
डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागातील तिन्ही पोलीस ठाण्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनेकदा किरकोळ कारणावरून प्रकरणे प्रलंबित राहतात. अशा प्रकरणांत प्रभारी अधिकार्‍यांनी तक्रारदार आणि समोरचा पक्ष यांना पाचारण करून त्यांच्याशी थेट संवाद साधला.अनेक कौटुंबिक आणि शेजारील वादात सामंजस्याने तोडगा काढण्यात आल्याने हे वाद जागीच मिटले.

शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी स्वतः तक्रारदारांच्या समस्या जाणून घेतल्या. वरिष्ठ कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या 62 अर्जांपैकी 33 अर्ज निकाली काढण्यात पोलिसांना यश आले असून 29 अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. तसेच पोलीस ठाणे स्तरावर स्थानिक पातळीवरील 28 अर्जांपैकी 9 अर्ज निकाली निघाले असून 19 अर्ज प्रलंबित आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकार्‍यांकडे आपली बाजू मांडता आली. प्रलंबित असलेल्या 48 अर्जांचा तपास लवकर पूर्ण करून ते निकाली काढण्याचे निर्देश संबंधित तपास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. अर्ज जर निकाली निघत नसतील तर तात्काळ गुन्हे दाखल करून अर्ज फाईल करावा, अश्या सूचना डीवायएसपी बारबोले यांनी दिल्यात.

अर्जदारांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा
जे अर्जदार शनिवारी येऊ शकले नाही, अश्या अर्जदारांनी पुढच्या शनिवारी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी दिलेल्या अर्जावर काय प्रक्रीया झाली हे जाणून घ्यावे, आपले म्हणणे मांडावे, यामुळे संबंधितांच्या तक्रार अर्जाचा निपटारा केला जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !