राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ
Sunetra Pawar took oath as the state’s first Deputy Chief Minister मुंबई (31 जानेवारी 2026) :उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 12 मिनिटांच्या या शपथविधी सोहळ्याला मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अनुपस्थिती होती.
सुनेत्रा पवार यांची शनिवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली. सायंकाळी पाच वाजता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.
या खात्यांचा मिळाला पदभार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेली तीन खाती देण्यात आली. क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असल्याने 2026-27 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील, हे स्पष्ट आहे.
खासदार पदाचा दिला राजीनामा
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. पती आणि राज्याचे लाडके नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ओढवलेल्या दु:खाच्या सावटाखाली असतानाच, त्यांनी दादांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास पुढे नेणार, असा दृढ निश्चय व्यक्त केला आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांचे मन भरून आले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत.
नेमके काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.
या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन. असे सुनेत्रा पवार म्हणाल्यात.


