धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गुजरातकडे जाणारी 16 लाखांची विदेशी दारु जप्त


Dhule Crime Branch takes major action: Foreign liquor worth 16 lakhs rupees being transported to Gujarat seized धुळे (31 जानेवारी 2026)  : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केवळ मध्यप्रदेशात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू गुजरातमध्ये नेण्याचा डाव हाणून पाडत 16 लाखांचा मद्यसाठा जप्त केल्याने तस्कर हादरले आहेत. पथकाने 25 लाखांच्या कंटेनरसह एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. चालकाच्या कबुली जवाबानंतर अनेक मोठे खुलासे होवून तस्कर जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावकडून धुळ्यामार्गे गुजरात राज्यात एका कंटेनरमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कल्पना देत शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटलसमोरील धुळे-जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला. संशयीत कंटेनर (आर.जे.52 जी.ए. 3630) आल्यानंतर पोलिसांनी तो अडवल्यानंतर कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे (52, रा.इंदोर, मध्यप्रदेश) याच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे देत वाहनात ‘स्पेअर पार्ट्स’ असल्याचे सांगितले.

पंचांसमक्ष तपासणीत निघाला विदेशी दारूचा साठा
पोलिसांनी पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी केल्यानंतर वाहनात ‘किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग प्रीमियम बिअर’चे तब्बल 400 बॉक्स आढळून आले. ही विदेशी दारू केवळ मध्यप्रदेशात निर्मित असल्याने तेथेच विक्रीची मुभा आहे मात्र विना परवाना या दारूची अवैध वाहतूक होत असल्याने पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे (52, रा.इंदोर, मध्यप्रदेश) यास अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला शिवाय 15 लाख 36 हजार रुपये किंमतीचे बिअरचे बॉक्स, 25 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 40 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक चेतन मुंढे, संजय पाटील, पवन गवळी, हवालदार संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !