मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ; विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प


मुंबई (1 फेब्रुवारी 2026) : अर्थसंकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे टाकलेले एक दमदार पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

17 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांचे बजेट भाषण 85 मिनिटांचे होते. यावर्षीच्या बजेटनुसार, देशभरात 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि 3 आयुर्वेदिक एम्स बांधले जाणार आहेत. याचबरोबर, कर्करोगाच्या 17 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !