!-- afp header code starts here -->

अनुभूती स्कूलमध्ये उद्या विज्ञान प्रदर्शन

50 हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश*


जळगाव (3 फेब्रुवारी 2026) : अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले 50 हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहायला मिळणार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, खगोलशास्त्र आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान अशा विविध शाखांतील प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रकल्प केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील आव्हानांना विज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यावर आधारित आहेत. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, स्मार्ट तंत्रज्ञान आणि शेतीतील आधुनिक उपाययोजना यांसारख्या विषयांवर विद्यार्थी कल्पकतेने आपले मॉडेल्स सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन रुजविण्यासाठी दरवर्षी असे प्रदर्शन भरविले जाते.

शाळेच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्पांची निर्मिती केली आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांनी अनुभवावर आधारीत शिक्षणाची संकल्पना अवलंबली आहे. सायन्स प्रदर्शना सारखे विविध उपक्रम त्यांच्याच प्रेरणेतून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न यातून होत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी इंटर-स्कूल विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, टीमवर्क आणि निरोगी शैक्षणिक स्पर्धेला चालना देणे हा आहे. दुसर्‍या दिवशी नामवंत वैज्ञानिक आणि विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:00 ते 12:00 या वेळेत शाळेच्या माध्यमातून नोंदणी करून विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची सोय केली आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी यांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आधी स्नेहल जोशी यांच्याशी 0257-2264600 या दूरध्वनीवर संपर्क साधावा व अग्रीम नोंदणी करावी, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !