वरणगाव रनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा ‘डंका’
Bhusawal Sports and Runners Association makes its mark in the Varangaon run वरणगाव (4 फेब्रुवारी 2026) : वरणगाव सिव्हील सोसायटी आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या तब्बल 60 धावपटूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. विविध वयोगटांतील धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भुसावळचे नाव उज्ज्वल केले.
यावेळी 10 किमी महिलांच्या स्पर्धेत एकता भगत प्रथम तर सायली बेंडाळे द्वितीय ठरल्या. तसेच 5 किमी महिलांच्या स्पर्धेत पुष्पा तिवारी द्वितीय तर विश्वनाथ पावरा 5 किमी पुरुषांच्या स्पर्धेत द्वितीय ठरले. विजेते धावपटू व्यासपीठावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस घेत असतांना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या इतर धावपटूंनी मोठा जल्लोष केला.

यावेळी व्यासपीठावर वरणगाव सिविल सोसायटीतर्फे या रनच्या सदिच्छादूत डॉ.चारुलता पाटील व गणसिंग पाटील तसेच असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ.नीलिमा नेहेते यांना देखील इतर मान्यवरांसोबत आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या धावपटू सहकार्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना विशेष आनंद झाल्याची भावना विजयी धावपटूंनी व्यक्त केली.
असोसिएशनच्या धावपटूंच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सातत्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत. या यशाबद्दल सर्व विजेत्यांचे व सहभागी धावपटूंचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे सचिव प्रवीण पाटील यांनी सांगितले.







