मालोदच्या तरुणाची लग्नाच्या बहाण्याने अडीच लाखात फसवणूक : धुळे जिल्ह्यातील सात आरोपींचे रॅकेट यावल पोलिसांच्या जाळ्यात


A young man from Malod was cheated out of two and a half lakh rupees under the pretext of marriage: A racket involving seven accused from Dhule district has been busted by Yawal police. यावल (5 फेब्रुवारी 2026)  : यावल तालुक्यातील मालोद येथील 35 वर्षीय तरुणास विवाहाकरिता मुलगी देतो, असे सांगत एका विवाहितेलाच नववधू आणि तिचे खोटे नातेवाईक उभे करून तरुणाचे लग्न लावत यापोटी दोन लाख 54 हजार उकळण्यात आले होते. लग्नानंतरच्या दुसर्‍या दिवशी माझ्या मावस भावाचा अपघात झाल्याचा बनाव नववधूने केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिसांनी या गुन्ह्यातील सात आरोपींना बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
मालोद, ता.यावल या गावात दिनेश शालिक पाटील (35) हा अविवाहित तरुण वास्तव्याला आहे. समाजात नोकरी नसल्यामुळे मुलगी मिळत नसल्याने दलालांच्या मार्फत लग्न जुळवले होते. या दलालांनी त्याच्याकडून लग्न जुळवणे व विवाहितेला काही दागिने व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दोन लाख 54 हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर मालोद गावात 12 जानेवारी रोजी विवाह पार पडला. दरम्यान विवाहाच्या दुसर्‍याच्या दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव कृतिका ऋतिक जावरे, रा.बादसर, ता.भडगाव)हिने सांगितले की, माझ्या मावस भावाचा अपघात झाला आहे. मला गावी तत्काळ जावे लागेल मात्र मावसभाऊ कुठे राहतो, काय करतो, कसा झाला अपघात, त्याचे नाव काय हे सांगताना मात्र तिची फजिती उडाली आणि पाटील कुटुंबाला संशय आला. तेव्हा त्यांनी तिला थेट 13 जानेवारी रोजी यावल पोलिसात आणले. पोलिसांनी सखोल चौकशी करत पैसे घेऊन लग्न करून नंतर नववधू देखील तेथून पळून जायची असे हे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी यावल पोलिसात दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सात आरोपींना अटक
यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार वसंत बेलदार यांनी या गुन्ह्यात पुनम सुरेश भिल्ल (अडावद, ता.चोपडा), दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव कृतिका ऋतिक जावरे (रा.बादशर, ता.भडगाव, हल्ली मुक्काम धुळे), मनोहर युवराज अहिरे (रा.अमरदे, ता. शिंदखेडा), बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील (अजंदे, ता.शिरपूर, जि.धुळे) व एक वधूची बनावट आई, बनावट आत्या आणि बनावट आजी अशा सात जणांना टप्प्या टप्प्याने अटक केली. यातील काही जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले तर महिलांनी पोलिसांना तपासात सहकार्य व मुद्देमाल आणून दिल्याने त्यांना नोटीसवर सोडण्यात आले.

एक लाख 70 हजारांची रोकड व दागिने जप्त
या गुन्ह्यातील नववधू व तिचे बनावट नातेवाईक तसेच पत्रकार म्हणून ओळख दाखवणारे अहिरे यांच्याकडून व इतर दलालांकडून पोलिसांनी एक लाख 70 हजारांची रोकड जप्त केली तसेच या चांदीचे दागिने, साड्या, बेनटेक्सचे मंगळसूत्र मिळून चार हजार 261 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

दलालांपासुन सावधनतेचा इशारा
ग्रामीण भागात लग्नाकरीता मुलगी मिळवून देतो, पैसे द्यावे लागतील असे आमिष दाखवणार्‍या दलालांपासून नागरीकांनी सावधान रहावे, अशा टोळक्याकडून पैसे उकळले जातात व लग्नानंतर वधू-देखील काही ना काही कारण दाखवून पळून जाते. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !