भुसावळातील तरुणीची शेअर मार्केटच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक
A young woman from Bhusawal was defrauded of 10 lakhs through a share market scam भुसावळ (6 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरातील 27 वर्षीय तरुणीचा ओळखीचा गैरफायदा घेत तिला शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली तसेच तिचा पाठलाग, धमक्या व विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात सिद्धांक मनोज हेडा या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
असे आहे फसवणूक प्रकरण
पीडीतेच्या तक्रारीनुसार, सन 2020 पासून ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संशयिताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिच्या डिमॅट खात्याची माहिती घेतली. त्यानंतर डिमॅट खात्यातून परस्पर पैसे काढणे, तसेच क्रेडिट कार्डचा गैरवापर करून मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याच दरम्यान संशयिताने फिर्यादीवर लग्नासाठी दबाव टाकत मुंबई ते मंगळूरपर्यंत तिचा पाठलाग केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

संशयिताने फिर्यादीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे तसेच तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून इंटरनेटवर अपलोड करण्याची व कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. इन्स्टाग्राम व व्हॉट्सपद्वारे सतत त्रास देत, फोटो व इतर डिजिटल डेटा डिलीट करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.







