एरंडोल तालुक्यातील खुनाचा उलगडा : मयत निघाली तृतीयपंथीय : लग्नासाठी दबाव वाढवल्याने संतप्त तरुणाने केली हत्या
नेल पॉलिश, नाकातील फुली ठरली तपासातील दुवा : गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची उकल
Murder in Erandol taluka solved : The victim was killed because a transgender person, with whom the accused had a relationship, was pressuring him for marriage एरंडोल (7 फेब्रुवारी 2026) : एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय वनपरिक्षेत्रात एका महिलेचा खून करून ओळख न पटण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला होता मात्र 48 तासात जळगाव गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मयत तृतीयपंथी असून तरुणासोबतच्या प्रेमसंबंधानंतर लग्नासाठी आग्रह धरल्याने तरुणाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील (21, रा.पहूर, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे तर आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे (मूळ रा.छत्तीसगड राज्य, ह.मु.सुरत) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
आधी ओळख नंतर प्रेम मात्र तृतीयपंथीय निघताच ट्वीस्ट
आरोपी नाशिकच्या पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीत भरतीची तयारी करीत असताना एका नाश्त्याच्या हातगाडीवर उभयंताची ओळख झाली व नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले मात्र सदर तरुणी ही तृतीयपंथी असल्याचे लक्षात आल्यावर स्वप्नीलने नाते तोडले तरीदेखील नाते पुढे कायम राहावे, स्वप्नीलने कायम सोबत रहावे म्हणून आकांक्षांचा आग्रह होता. स्वप्नील नाते तोडण्याचा प्रयत्न करत असल्याने आकांशाने स्वप्निलच्या गावी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याची बदनामी केली होती. आपली सर्व ठिकाणी बदनामी झाल्याच्या आणि होत असल्याच्या रागातून स्वप्नील संतप्त होता तसेच आकांक्षाकडून होत असलेल्या त्रासाच्या रागातूनच स्वप्निलने नियोजनबद्ध रित्या आकांक्षाची निर्घुणपणे हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.
हत्येच्या दिवशी काय घडले ?
हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशी दोघांनी सोबत मद्यप्राशन केल्यानंतर दोघे पद्मालयजवळच्या जंगलात गेले व तेथे आरोपीने डोक्यात बियरची बाटली मारून आकांक्षाला बेशुद्ध केले व दुचाकीतील पेट्रोल काढून तिला जाळून मारले व घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडल्याने पोलिस पथकातर्फे मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना एका हॉटेलमध्ये दोघे मद्यप्राशन करीत असल्याचा पोलिसांना क्लू मिळाला.
नाकातील फुली व नेल पॉलिशने पटली ओळख
मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाची नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुरणी’ (फुली) यावरून महिलेची ओळख पटवण्यास मदत झाली. मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तज्ज्ञांनी या महिलेचा मृत्यू 30 किंवा 31 जानेवारी रोजी झाल्याचा निष्कर्ष काढला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे व सहकार्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.


