यावलला बीडीओ गैरहजर, कर्मचार्‍यांची दांडी : यावलला भेटीदरम्यान आमदार जावळे संतप्त ; सीईओंकडे तक्रार


काहूरखेडे, ता.भुसावळ (7 फेब्रुवारी 2026) : यावल पंचायत समितीच्या कार्यालयाला यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली मात्र यावेळी गटविकास अधिकारी डॉ.मंजूश्री गायकवाड गैरहजर होत्या. विशेष म्हणजे त्यांचा रजेचा अर्ज उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमदार जावळे यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

पशू संवर्धन विभागाला भेट
आमदार जावळे यांनी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला भेट दिली. या विभागात अधिकारी उपस्थित नव्हते. कामाच्या वेळेत अनेक अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसून आल्याने आमदार जावळे चांगलेच संतप्त झाले. जनतेची कामे प्रलंबित ठेवून अधिकारी बेपत्ता राहणार असतील तर हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, असेही ते म्हणाले. गटविकास अधिकारी राज्यात दुखवटा असताना जि.प.सीईओ यांनी 29 जानेवारीला यावल पंचायत समितीत आढावा बैठक घेतली होती.

यावेळी मालोद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला प्रशिक्षणाला पाठवण्यासह तत्काळ प्रभारी ग्रामसेवक नेमण्याची सूचना त्यांनी गटविकास अधिकार्‍यांना केली होती. या विषयीची आदेश तयार झाला असून त्यावर स्वाक्षरी झाली नसल्याचे कक्ष अधीक्षक ज्ञानेश्वर निळे यांनी सांगितले.

प्रशासनातील बेजबाबदार कार्यपद्धती थेट ग्रामीण विकासाच्या कामांवर परिणाम करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली तसेच गटविकास अधिकार्‍यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली. त्यामुळे प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या भेटीमुळे अधिकारी धास्तावले आहेत.

ग्रामसेवक नियुक्तीला सहीची प्रतीक्षा
अधिकार्‍यांमध्ये विरोधाभास जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांनी 29 जानवेारीला मालोदला तात्काळ प्रभारी ग्रामसेवक नियुक्त करावा, असे आदेश दिले होते. या विषयी कक्ष अधीक्षक ज्ञानेश्वर निळे म्हणाले की, मालोदला प्रभारी ग्रामसेवक नियुक्तीचा निर्णय सोमवारी होईल. गटविकास अधिकारी डॉ. गायकवाड म्हणाल्या की, असा कुठलाच निर्णय आमच्या स्तरावर घेऊ शकत नाही. सीईओंनी लेखी पत्र दिल्यास निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणी दोन्ही अधिकार्‍यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून आला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !