भुसावळात रात्री दहानंतर आता डीजेचा दणदणाट बंद : कारवाईसाठी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती


In Bhusawal, loud DJ music will now be stopped after 10 PM: Police personnel have been deployed to take action भुसावळ (8 फेब्रुवारी 2026)  भुसावळ शहरात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डीजे बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार रात्री 10 वाजल्यापासून डीजे व मोठ्या आवाजातील वाद्ये वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे. नियमभंग करणार्‍यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

गुन्हेगारांवरही करडी नजर
दरम्यान, शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता हद्दपार तसेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा) अंतर्गत कठोर कारवाईचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत व वारंवार गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात येणार असून एकूण 15 जणांवर हद्दपार व एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे.

उपद्रवींवर पोलिसांचे लक्ष
या कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांची नावे निश्चित करण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या व्यक्तींवर कडक पावले उचलली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. डीजे बंदी, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच हद्दपार व एमपीडीए प्रस्तावांमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास डीवायएसपी केदार बारबोले यांनी व्यक्त केला आहे.

अधीक्षकांच्या सूचना
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची कुंडली तयार करा, त्यांच्यावरील गुन्हयांनुसार कोणावर हद्दपार तर कोणा विरूध्द एमपीडीएची कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आठवडाभरात हद्दपार आणि एमपीडीएचे प्रस्ताव शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यातून तयार होऊन जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे रवाना होणार आहे. ग्रामीण भागातील सुध्दा नावे काढण्याचे काम क्राइम विभागातर्फे सुरू केले आहे.

कायदा मोडणार्‍यांची गय नाही
कायदा मोडणार्‍या कोणालाही सोडणार नाही, कायदा सर्वात मोठा आहे, यामुळे जो कायदा हातात घेईल त्याला त्याच कायद्याने उत्तर दिले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दितील उपद्रवी, दादागिरी, कायदा हातात घेणारे, चिथावणीखोर अश्या संशयीतांवरील गुन्हे पाहीले जात होते. त्यांच्यावर धडक कारवाई केली जाणार असल्याचे उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !