यावल कृउबाच्या कर्मचार्याला मारहाण : तिघांविरोधात गुन्हा
Assault on an employee of the Yawal Agricultural Produce Market Committee: Case registered against three people यावल (8 फेब्रुवारी 2026) : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोकन देण्यासाठी गेलेल्या कर्मचार्याला मालाची गाडी भरण्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना पाडळसा येथे घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
दिगंबर गजानन चौधरी (42, रा.गांधी चौक, सावदा) हे कृषी उत्पन्न बाजार समिती यावलला नोकरीला आहेत. गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास पाडळसा येथील बाळू रुपचंद तेली यांच्या धान्य गोदामासमोर टोकन देण्यासाठी गेले असता चौधरी यांनी संशयित आरोपींना विचारले की, ट्रान्सपोर्टची गाडी कुठे आहे? आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर गाडी कशी भरून घेता? या साध्या विचारणेचा राग संशयित आरोपींना आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
रागाच्या भरात बाळू रुपचंद तेली याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ज्ञानेश्वर बाळू तेली आणि सागर रवींद्र तायडे यांनी चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ला एवढ्यावरच थांबला नाही ज्ञानेश्वर तेली याने फिर्यादीच्या तोंडावर बुक्का मारून त्यांच्या नाकाला दुखापत केली तर हातातील लाकडी काठीने त्यांच्या दोन्ही पायांवर प्रहार करून गंभीर जखमी केले. पुन्हा इकडे आलास तर तुला पाहून घेऊ, अशी धमकीही यावेळी संशयित आरोपींनी दिली.
या प्रकरणी दिगंबर चौधरी यांनी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.


